अमरावती Maharashtra Weather Update :अमरावती शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (29 नोव्हेंबर) रात्री दहाच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. मध्यरात्री पावसाचा जोर ओसरल्यावर पहाटे अमरावती शहरात रिमझिम पाऊस बरसला. तर मेळघाटात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, अवकाळी पावसामुळं अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळं बुधवारपासून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती शुकशुकाट पाहायला मिळतोय.
या भागात आज पाऊस कोसळण्याची शक्यता : विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही भागात धुकं राहणार आहे. तसंच अंदमान लगत समुद्रात 1 डिसेंबर रोजी चक्रीवादळ निर्माण होणार आहे. मात्र, या चक्रीवादळाचा विदर्भात विशेष परिणाम जाणवणार नाही, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
चक्राकार वाऱ्याचा प्रताप : दक्षिण अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहतायत. या वाऱ्यापासून केरळ, कर्नाटक मार्गे उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाची दोन्ही स्थिती आहे. तसंच श्रीलंका किनारपट्टीवर चक्राकार वारे असल्यानं बंगालच्या उपसागरातून हवेच्या खालच्या थरातून येणारे वारे, तसंच अरबी समुद्रातून हवेच्या मधल्या थरातून येणारे वारे यांच्या परस्पर संयोगामुळं आणखी दोन दिवस मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. तसंच बंगालच्या उपसागरात 1 आणि 2 डिसेंबरला निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे 4 आणि 5 डिसेंबरला देखील विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचंही प्रा. अनिल बंड म्हणाले.