अमरावती :अमरावती जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण होते. चांदूरबाजार आणि अचलपूर तालुक्यात अनेक भागात बुधवारी दुपारी आणि सायंकाळी पाऊस कोसळला. अमरावती तालुक्यात देखील बुधवारी रात्री अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. आज पहाटे चार वाजल्यापासून जिल्ह्यात सर्व दूर पावसाला सुरुवात झाली. अमरावती चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वे तिवसा, चांदुर बाजार, अचलपूर, मोर्शी, वरूड, दर्यापूर, चिखलदरा आणि धारणी अशा सर्वच तालुक्यात कुठे मुसळधार स्वरूपात तर कुठे तुरळक प्रमाणात पाऊस बरसला.
शेतकऱ्यांचे नुकसान :मार्च महिन्यात बसणाऱ्या ह्या अवकाळी पावसामुळे शेतातील गहू, हरबरा आणि कांद्याला प्रचंड फटका बसणार असा अंदाज शेतीतज्ञांनी व्यक्त केला. शेतात आलेली पीक त्वरित काढून टाकावी किंवा जी पीक काढल्यावर शेतातच ठेवण्यात आली आहे ती झाकून ठेवावी अशा सूचना आधीच हवामान विभागासह कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिल्या होत्या. दरम्यान या अवकाळी पावसाचा आंब्याच्या बहारावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात असणारे टरबूज सुरक्षित ठिकाणी ठेवावे तसेच किडलेले टरबूज बाहेर काढावेत असा सल्ला देखील कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
23 मार्च पर्यंत राहणार पाऊस : अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात 23 मार्च पर्यंत हा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. 17 आणि 18 तारखेला वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसणार असा इशारा देखील देण्यात आला आहे. गत काही दिवसांपासून वाढलेला उन्हाचा पारा आता पुढील पाच दिवस खाली घसरणार आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान 34.2 ते 37.4 सेल्सिअस तर किमान तापमान 18.6 ते 20.6°c च्या दरम्यान राहील. सकाळची आद्रता 59 ते 73 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 46 ते 55 टक्के दरम्यान राहील वाऱ्याचा वेग सरासरी ताशी 7.2 किलोमीटर राहणार आहे. 19 मार्च पर्यंत आकाश ढगा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी देखील अनेक भागात मेघगर्जनीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 मार्चला जिल्ह्यात तुरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात विजांच्या कडकडाटांस पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा :Leopard Attack In Nashik: बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षांची बालिका ठार; बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी