अमरावती -कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेसह सर्वच जण अडचणीत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही वीज वितरण कंपनीने वीज देयक चौपटीने वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचा अंत पाहू नका, असे म्हणत या वीज देयकाला खासदार नवनीत राणा यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच हे वाढीव देयक आम्हाला मंजूर नसल्याचे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.
वाढीव वीज देयकाविरुद्ध नवनीत राणा यांनी विद्युत भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी वीज कंपनीच्या मुख्य अभियंता सुमित्रा गुर्जर यांच्याशी वाढीव वीज देयकाबाबत चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत कोणाच्याही घरी जाऊन मीटर न तपासता वीज कंपनीने जे देयक काढले ते चुकीचे आहे. शेतकरी, शेतमजूर सर्वच अडचणीत आहेत. सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप यावेळी नवनीत राणा यांनी केला.