अंजनगाव सुर्जी (अमरावती)- तालुक्यात दोन दिवसापूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने तालूक्यातील कांदा ऊत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळीने हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अंजनगाव सूर्जी तालूक्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हिवाळ्यात लावलेला कांदा उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात काढण्यासाठी येतो. तालुक्यात पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्याला परराज्यात चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा पिकवतो. परंतु यावर्षी पावसाने एकाही महिन्यात खंड दिला नाही
खराब हवामानामुळे कांद्यावर सुरुवातीपासूनच रोगाचे आक्रमण तर झालेच, ज्यामूळे कांद्याचा आकार लहानच राहिला व वजनातही घट झाली. संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केल्याने सगळीकडे व देशात लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ बंद आहे. कांदा काढण्याच्या वेळेसच बाजार बंद असल्याचा फायदा व्यापारी घेत असताना १० तारखेला अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. शेतकऱ्यांनी जमिनीतून काढलेला कांदा शेतात लावून ठेवला असताना त्यावर पाणी पडल्याने कांदा शेतातच खराब होण्याची परीस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत ज्या भावात विकला जाईल त्या भावात शेतकरी कांदा विकण्यास तयार झाल्याने व्यापारीही पडलेल्या भावात कांदा घेत
आहेत. यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. तालुक्यात सध्या व्यापारी १४०० ते १५०० रुपये खंडी (दोन क्विंटलची एक खंडी) सातशे रुपये क्वींटलने कांदा विकत घेत असून यावर आणखी पाऊस आला तर मातीमोल भावात कांदा जाण्याची शक्यता आहे. त्यामूळे तालूक्यातील कांदा ऊत्पादक शेतकरी संकटात सापडला असून सरकारने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या कांद्याचा भाव जरी कमी असला तरी येणाऱ्या एक-दोन महिन्यात किंवा लाॕकडाऊन संपल्यानंतर कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळू शकतो. कारण यावर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाले असून पिकलेला पांढरा कांदा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खेरदी केल्याचे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.