शिक्षिका स्मिता लहाने ढोक माहिती देताना अमरावती : शाळेची एक वर्गखोली पूर्णतः कोसळून पडलेली तर उरलेल्या दोन खोल्यांची अवस्था जीर्ण झालेली. वर्षभरापूर्वी कुणीही साधी दखल घेत नसणाऱ्या अचलपूर तालुक्यातील वाढोणा या गावात स्मिता लहाने ढोक या शिक्षिका रुजू झाल्या. त्यांनी आपल्या वर्ग खोलीचे रूप पालटण्याचा पुढाकार घेतला. वर्गातील त्यांचे नवे प्रयोग समाज माध्यमांवर वायरल झाले.
सुंदर सजवले वर्ग : एक शिक्षिका काहीतरी चांगले करीत आहे हे पाहून अनेकांनी शाळेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनाही याची जाणीव झाली. आज एखाद्या खाजगी शाळेच्या वर्ग खोलीलाही लाजवेल इतका सुंदर वर्ग वाढवण्याच्या जिल्हा परिषद शाळेत सजला आहे. विशेष म्हणजे केवळ रंगरंगोटीच नव्हे तर शाळेतील चिमुकले अगदी हसत खेळत गणिताच्या कृप्ती सोडवीत आहे. तर त्यांच्या सामान्य ज्ञानात देखील चांगलीच भर पडली असून हे चिमुकले शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध होत आहेत.
शाळेचे रूप बदलण्याचा निश्चय : अचलपूर तालुक्यात वाढोणा हे छोटेसे गाव असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत अठरा विद्यार्थी आहेत. दोन शिक्षिका असणाऱ्या या शाळेत एकाच वर्गखोलीत दोन वर्ग भरतात. पाच वर्ष डायटमध्ये गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून अनुभव असणाऱ्या स्मिता लहाने या वर्षभरापूर्वी वाढवणा येथील शाळेत रुजू झाल्या. तीन विषयात पदव्युत्तर पदवी आणि सेट उत्तीर्ण असणाऱ्या सुनीता लहाने यांनी वाढवणा येथील शाळेत पाऊल ठेवताच या शाळेचे संपूर्ण रूप बदलण्याचा निश्चय केला.
शाळेची आदर्श वाटचाल : स्मिता लहाने डायटमध्ये काम करण्यापूर्वी दहा वर्ष अमरावती तालुक्यात येणाऱ्या गोपाळपूर येथील शाळेत होत्या. त्यांनी केलेल्या गोपाळपूर येथील शाळेचा विकास पाहता अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट दिली होती. अमरावती शहरातील अनेक खाजगी शाळांनी देखील गोपाळपूर येथील शाळेत सुनीता लहाने यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी भेटी दिल्या होत्या. गोपाळपूर मध्ये मी जे काही केले तसाच शैक्षणिक विकास आता वाढोणा येथील शाळेत देखील करायचा असल्याचे सुनीता लहाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.
सुरूवातीला स्वखर्चाने रंगरंगोटी : स्मिता लहाने म्हणाल्या की, या शाळेत रुजू झाल्यावर मी स्वखर्चाने या वर्ग खोलीची रंगरंगोटी करण्यास सुरुवात केली. माझ्या कामाची माहिती मी सोशल मीडियावर पोस्ट करायची यातूनच माझ्या परीची काही व्यक्तींनी या कामासाठी सरकार पैसे देते का असे विचारले यावर हे सर्व मी स्वखर्चाने करीत असल्याचे त्यांना सांगितल्यावर मला सर्वात आधी पंकज अग्रवाल यांनी आर्थिक मदत दिली. यानंतर या गावातील लोकांनी देखील सहकार्य केले. यामुळे या वर्ग खोलीची रंगरंगोटी करण्यात आली. ही वर्गखोली केवळ रंगलीच नाही तर विविध म्हणी तसेच गणित विज्ञान या संदर्भातील माहिती देखील या भिंतीवर नमूद करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा वाढतो उत्साह : स्मिता लहाने पुढे म्हणाल्या की, वर्ग खोलीत आल्यावर चिमुकल्यांचा उत्साह वाढवा म्हणून भिंतीवर लहान मुलांची जी चित्र काढण्यात आली आहेत, त्या चित्रांवर वर्गातील मुलांची नावे लिहिण्यात आली. वर्गखोलीच्या भिंतीवर आपले नाव वाचून या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. या वर्ग खोलीच्या चारही भिंतीवर नजर फिरवली तरी विद्यार्थ्यांचा गणित, विज्ञान, इतिहास व भूगोल अशा विषयांचा बराचसा अभ्यास होत असतो.
अशा पद्धतीने केला जातो अभ्यास : लहान विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा यासाठी हसत खेळत अनेक खेळ शाळेच्या आवारात खेळले जातात. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढणे यासह कोणत्याही अडचणी समस्या सोडविण्यासाठी हे चिमुकले तत्पर व्हावेत अशासारखा अभ्यास खेळांच्या मार्फत शिकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्मिता लहाने यांनी सांगितले. शाळेत आल्यावर रोज नित्यनेमाने ध्यान लावणे तसेच प्रार्थना विद्यार्थी करतात. ध्यान लावताना आपल्याकडे लाल दिव्याची गाडी आहे, असा विचार करण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यास करून मोठे व्हायची प्रेरणा देण्याचे संपूर्ण प्रयत्न केला जात असल्याचे देखील स्मिता लहाने यांनी स्पष्ट केले.
आदिवासी चिमुकलेही शिक्षणाच्या प्रवाहात : मेळघाटात मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गावातील एक कुटुंब तीन वर्षांपासून वाढोणा गावातील एका शेतात काम करण्यासाठी आले आहे. या आदिवासी दाम्पत्याची तिन्ही मुलांची नावे कुठल्यातरी आश्रम शाळेत आहेत. मात्र, या चिमुकल्यांनी आजपर्यंत त्यांची शाळा पाहिली नाही. आई वडील शेतात राबत असताना हे तिन्ही चिमुकले शेतात खेळायचे. सुनिता लहाने या शाळेत येताना या चिमुकल्यांना नेहमी पाहायच्या. त्यांनी त्यांची चौकशी केली आणि आपल्या शाळेत त्यांना पाठवा अशी विनंती पालकांना केली. आज दोन मुली आणि एक मुलगा असे या आदिवासी दांपत्याची तिन्ही मुले वाढोणा येथील शाळेत नियमित येतात. विशेष म्हणजे इतर मुलांप्रमाणेच सर्वच विषयाचे ज्ञान त्यांना आले असून त्यांच्या पालकांना कळत नसणारी आणि बोलताही न येणारी मराठी भाषा हे तिन्ही चिमुकले छान बोलायला लागले आणि लिहायला देखील लागले आहेत.
हेही वाचा : Palghar ZP School : विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी फरफट; झाडाखाली भरते शाळा