अमरावती -अमरावतीमध्ये कोरोना बाधितांची रुग्ण संख्या ही दररोज एक हजारांपेक्षा जास्तने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या समोरील अडचणीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी आणि करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवस अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यान आता फक्त वैद्यकीय सेवा सुरू राहणार असून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे आज अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी अमरावतीकरांनी तुफान गर्दी केली होती.अमरावतीच्या रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या अंड्याच्या मुख्य दुकानापुढे मात्र शेकडो ग्राहकांच्या आणि छोटे व्यावसायिकांच्या मात्र लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. यावेळेस मात्र अनेकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते.
कोरोनाग्रस्तांचा रोजचा आकडा हजारावर
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या गत चार दिवसांपासून एक हजाराच्या वरच्या संख्येने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 1 हजार 125 नव्या कोरोना रुग्णांनाची भर पडली तर गुरुवारी 1 हजार 189 कोरोना रुग्ण आढळले. बुधवारी हा आकडा 1 हजार 189 इतका होता. जिल्ह्यात सध्या 9 हजार 961 कोरोना रुग्ण आहेत.