अमरावती - मध्यप्रदेशच्या सीमेवरून राज्यात प्रवेश केलेल्या टोळधाड या कीटकांनी वरुड मोर्शी तालुक्यात थैमान घातल्याने अनेक पिके खराब झाली आहेत. आधीच अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतमाल विकण्यासाठी अडचणी उद्भवल्या. आता टोळधाडीमुळे आणखी संकटात वाढ झालीय.
आधी कोरोना, नंतर अवकाळी पाऊस अन् आता टोळधाड किटकांचे अमरावतीत थैमान!
मध्यप्रदेशच्या सीमेवरून राज्यात प्रवेश केलेल्या टोळधाड या कीटकांनी वरुड मोर्शी तालुक्यात थैमान घातल्याने अनेक पिकं खराब झाली आहेत. आधीच अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतमाल विकण्यासाठी अडचणी उद्भवल्या. आता टोळधाडीमुळे आणखी संकटात वाढ झालीय.
भाजीपाला, फळभाज्या आणि संत्र्याला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी माजी कृषी मंत्री बोंडे यांनी केली आहे.
टोळधाड कीटकांच्या थव्याने आधी राजस्थान आणि मध्यप्रदेशातील पिकांवर हल्ला चढवला. यानंर आता या टोळधाडीने महाराष्ट्रच्या सीमेवरून अमरावतीत प्रवेश केला आहे. मेळघाट परिसरानंतर, मोर्शी तालुक्यात या टोळधाडीने पिकांचे नुकसान केल्यानंतर सोमवारी वरुड तालुक्याकडे कूच केली आहे.
मोर्शी तालुक्यातील पाळा, भिवकुंडी, भाईपूर, हिवरखेड शिवारातील संत्रा झाडे, संत्रा बहार, मक्यावर टोळधाड आली असून पिकांची पाने फस्त केली आहेत. जवळपास तीन किलोमीटरच्या थव्याने हे पुढे सरकत आहे. तसेच टोळधाडीने अंडे टाकल्याने अधिक जास्त प्रमाणात नुकसान होते.
मध्यप्रदेश शासनाने अग्निशमन दलाच्या यंत्राने संपूर्ण परिसराची फवारणी करून या टोळधाडीवर नियंत्रण मिळवले आहे. त्याचप्रमाणे कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेऊन मोर्शी-पाळा, भाईपूर, हिवरखेड परिसरात अग्निशमन यंत्राने फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतांचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.