अमरावती - आता अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 15 फेब्रुवारीपासून अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता.
पुन्हा नागरिकांची तूफान गर्दी
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. त्यामुळे कालपासून (1 जून) बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. काल पहिला दिवस असल्याने बाजारपेठेमध्ये पुन्हा मोठ्या संख्येने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. आज (2 जून) सलग दुसऱ्याही दिवशी अमरावतीच्या जयस्तंभ चौक, ईतवारा, सराफा बाजार, जवाहर गेट या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.