अमरावती- लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात दारूची दुकाने बंद आहेत. मात्र, राज्य शासनाने दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारूची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर, कित्येक दिवसापासून दारूचा घोट न घेतलेल्या तळीरामांनी आपली दारूजी तहान भागवली. केवळ दोन दिवसातच तळीरामांनी १ कोटी ४० लाख रुपयांची देशी, विदेशी दारू खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसात जिल्ह्यातील दारूच्या दुकानांमधून तब्बल ९७ हजार ६०० लिटर दारूची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७२ हजार लिटर देशी दारू विकली गेली आहे. देशीदारूबरोबरच ११ हजार ६०० लिटर बीअर व १४ हजार लिटर विदेशी दारू देखील विकली गेली आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने देशभरातील दारूची दुकाने, बार हे बंद होते. परंतु, केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारू विक्रीला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वरूड व शिरळा वगळता बाकी सर्व ठिकाणची देशी दारू, बार व वाईन शॉप दुकाने सुरू करण्यात आली.