अमरावती Leopard Terror in Amravati :अमरावती शहरातील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात गतकाही महिन्यांपासून असणाऱ्या बिबट्याची दहशत कायम असताना आता पहाडांनी वेढलेल्या मंगलधाम परिसरात रात्री अंधार पडताच दोन मोठे बिबटे बिनधास्त संचार करीत असल्याचं समोर आलंय. स्थानिक रहिवाशांनी या दोन्ही बिबट्यांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले असून हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
आठ दिवसांपासून वाढली भीती : मंगलधाम आणि महादेव खोरी हे लागून असलेले दोन्ही परिसर पूर्वी असणाऱ्या घनदाट जंगल भागात वसले आहेत. गत दहा वर्षांपासून या भागात शेकडो घरं झाले असून या ठिकाणी अधूनमधून बिबट्यांसह वाघाचेदेखील दर्शन अनेकांना घडते. मात्र मागील काही महिन्यांपासून वन्यप्राणी दिसेनासे झाले होते. पण आता पुन्हा एकदा धष्टपुष्ट आणि जवळपास माणसाच्या उंचीपर्यंतचे दोन बिबटे सलग आठ दिवसांपासून रात्रीच्या अंधारात निळकंठ लेआउट परिसरात रोज रात्री फिरत आहेत. या भागातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती वाढली आहे.
भीतीसह बिबट्याला पाहण्याची उत्सुकता :मंगलधाम परिसरात उंच टेकडीवर असणाऱ्या गौरक्षण संस्थेच्या जागी लागूनच असणाऱ्या श्रीनिवास अपार्टमेंट येथे राहणाऱ्या अनेकांना गत आठ दिवसांपासून बिबट्या कधी रात्री आठ वाजता तर कधी रात्री दोन दरम्यान आपल्या घराच्या खिडकीतून दिसतोय. शनिवारी रात्री या अपार्टमेंटमधील अनेक रहिवासी इमारतीच्या छतावर चढून लगतच्या घनदाट झुडपात बिबट्या दिसतो का हे पाहण्यासाठी उत्सुक होते. पाडावरील आणि इमारती समोरील झुडपांमध्ये मोठ्या टॉसचा लाईट लावून बिबट्याचा शोध घेतला जात होता. हे बिबटे नेमक्या कोणत्या मार्गानं परिसरात येतात आणि परिसरातील डुक्कर, कुत्र्यांची शिकार करून कुठल्या मार्गानं निघून जातात याची माहितीदेखील या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.