अमरावती : चिखलदरा पर्यटन महोत्सव शनिवारी सुरू झाला असून आजपर्यंत म्हणजेच 16 जुलैपर्यंत राहणार आहे. या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे शनिवारी सकाळी उद्घाटन झाले आहे. थंड हवेच्या ठिकाणासह पावसाळी पर्यटन स्थळ ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून चिखलदऱ्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. परंतु महोत्सवाचे ढिसाळ नियोजन, बेशिस्त वाहतुकीमुळे पहिल्या दिवशीच बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मान्सून डेस्टिनेशन : चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन चिखलदरा पर्यटन महोत्सवासह ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव’ यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे तसेच येथील दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येथे उत्साहाने येतात. पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य, हिरवळ, जागोजागी असलेले धबधबे, ढगाळ कुंद वातावरण, सकाळी तसेच सायंकाळी धुक्याचे सर्वत्र आच्छादन यामुळे चिखलदरा ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून विकसित व्हावे, यासाठी पर्यटन संचालनायामार्फत येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र बेशिस्त वाहतूक आणि ढिसाळ नियोजनाचा फटका मात्र वन्य प्राण्यांना बसत आहे. महोत्सावाच्या पहिल्या भरधाव कारच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला.