अमरावती -कोणी म्हणते देवांनी बांधले तर कोणी म्हणते राक्षसांनी हे बांधकाम केले. अनेकांची वेगवेगळी मते असली तरी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणारे लासुर येथील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हेमाडपंथी शैलीचे आनंदेश्वर अर्थात महादेव मंदिर ( Anandeshwar Mahadev Temple Amravati ) जो कोणी पाहिल तो थक्क होईल, असा आश्चर्याचा खजिनाच आहे. अष्टकोनी आकाराच्या या मंदिरावर छत नाही. कोणी म्हणत छत बांधायचं राहून गेलं तर काही तज्ञ म्हणतात गाभाऱ्यात लख्ख प्रकाश यावा यासाठी हे असंच खुलं ठेवण्यात आलं. या भागात दूरपर्यंत कुठेही न सापडणाऱ्या दगडांनी रचलेल्या ह्या मंदिरावर अतिशय कोरीव नक्षीकाम आहे. श्रावण महिना असल्यामुळे सध्या या मंदिर परिसरात अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यातील भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे. ( amaravati lasur Anandeshwar mahadev temple )
असे आहे मंदिराचे वैशिष्ट्य -अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात पूर्णा नदीच्या काठावर लासुर या गावात महादेवाचे मंदिर आहे. अष्टकोणी आकाराचे हे मंदिर जणू भल्या मोठ्या रथाला हत्ती जुमला असावा अशाच स्वरूपाचे दिसते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडीपाड्या एकावर एक रचून करण्यात आले असून प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या आत मध्ये व सभागृहात भरपूर प्रकाश यावा या उद्देशाने मधला सभागृह मंडप उघडा ठेवण्यात आला असावा असे काहींचे म्हणणे आहे तर मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे हा घुमट उघडाच असल्याचे काही मंडळी सांगतात. मात्र हा उघडा असणारा घुमट या मंदिराच्या सौंदर्यात अफाट भर घालतो आहे.
या मंदिरात एकूण 18 खांब आहेत यापैकी बारा खांब हे खोले असून सहा खांब हे भिंतीमध्ये आहेत. प्रत्येक खांबावर अतिशय बारीक आणि शिलाईदार शिल्पकाम आढळते कोरीव आकृत्या आणि कलात्मक नक्षीकामामुळे प्रत्येक खांब अतिशय सुंदर दिसतो मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर भूमितीय आकृत्या लता वेली फुले फळे यांची कोरीव कलाकुसर आहे काही ठिकाणी भिंतीवर आलेख पद्धतीचा वापर झालेला आढळतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत मध्ये भव्य खुला सभा मंडप आहे आणि मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यास पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात तेवढ्याच आकाराचे दोन दालन आहेत मंदिराच्या पूर्वेकडील दालनाच्या छतावर सुंदर आणि अप्रतिम भौमितिक आकृत्या काढलेल्या आहे. या मंदिरात एका गाभाऱ्यात शिवलिंग आहे तर पूर्व आणि पश्चिमेकडे बांधण्यात आलेल्या गाभाऱ्यांमध्ये कोणत्याही मुर्त्या नाहीत. मात्र या ठिकाणी अनेक कोरीव दगड पडलेली असून या गाभाऱ्यांमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या मुर्त्यांचे काम अर्धवट राहिले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.
हेही वाचा -CNG Rate : देशात सर्वात महाग सीएनजी दर नागपुरात, अचानक झाली मोठी वाढ
मंदिराला अमर्याद कोन - अष्टकोनी दिसणाऱ्या या मंदिराला अमर्याद असंख्य कोन आहेत. प्रत्येक कोन हा 90 अंशाचा भरतो, हे या कोनांचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर अनेक कोनाडे असून त्यामध्ये विष्णू, शिवब्रम्हा, राधाकृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मुर्त्या आहेत. यासोबतच हत्ती, घोडे, लढवय्ये, डोंबारी, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती असे अनेक चित्र मंदिराच्या लावलेल्या दगडांवर करण्यात आले आहे.
दिडशे किलोमीटर अंतरावरून आणले असावे दगड ! लासुर येथील आनंदेश्वर मंदिर उभारण्यासाठी च्या दगडांचा वापर करण्यात आला आहे तसे दगड लासुर परिसरात किंवा संपूर्ण दर्यापूर तालुक्यात कुठेही आढळत नाही. यामुळे हे मंदिर बांधण्यासाठी हे दगड कुठून आणले असावे याचा ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी हे दगड दीडशे किलोमीटर अंतरावरून सालबर्डी येथील सातपुडा पर्वतरांगेतून आणले असावे असा अंदाज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. मंदिर परिसरातून वाहणारा पूर्णा नदीतून हे दगड आणले असावे किंवा हत्तीच्या साह्याने हे दगड या परिसरात आणण्यात आले असावे असे देखील प्रा. डॉ. संतोष बनसोड म्हणाले.