अमरावती- दिवाळीला संपूर्ण जग हे दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघावे यासाठी घरोघरी दिवे लावले जातात. मात्र, स्वत:चे भवितव्य अंधारात शोधत जगणाऱ्यांचे हात दिवाळीत प्रत्येकाच्या घरात प्रकाश पडावा म्हणून दिव्यांची निर्मिती करीत आहेत. इतरांच्या आनंदांतच आपली दिवाळी ही भावना ठेऊन शहरातील वूमन्स फौंडेशनच्यावतीने दीप निर्मितीचे कार्य सुरू आहे. अमरावती शहरालगतच्या तपोवनातील गोकुळ निवासी आश्रमात हा उपक्रम दिपज्योतीचा राबविला जात आहे.
एचआयव्हीबाधित झटताहेत दिवाळीच्या प्रकाशासाठी एचआयव्ही बाधित निराधारांना आधार-
तृतीयपंथीच्या समस्या,अडचणी यासाठी काम कररणाऱ्या वुमन्स फाउंडेशनच्या प्रमुख गुंजन गोळे यांनी गत दोन वर्षांपासून एचआयव्ही बाधित निराधारांना आधार देण्यासाठी गोकुळ हे निवासी आश्रम सुरू केले आहे. याठिकाणी एचआयव्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या 4 महिला आणि सात ते आठ बालके आहेत. निवासी आश्रमात राहणाऱ्या प्रत्येकाची आपली स्वतंत्र कहाणी आहे. देशाच्या विविध भागातून एकत्र आलेल्या या सगळ्यांचे गुंजन गोळे यांचे गोकुळ हेच घर झाले आहे.
एचआयव्हीबाधित झटताहेत दिवाळीच्या प्रकाशासाठी या गोकुळाला शासनाची कुठलही मदत नाही. तपोवन संस्थेने आश्रमासाठी जागा दिली आहे, तर काही जणांची मदत होत आहे. मात्र, असे असले तरी इतरांच्या मदतीपेक्षा आपणच आपलं स्वावलांबी व्हावे, असा निश्चय करून गुंजन गोळे यांनी गोकुळातील आपल्या कुटुंबासह आता दिवाळीनिमित्त माती आणि शेणाचे दिवे बनविण्यास सुरुवात केली.
अतिशय सुंदर आकाराचे आणि विविध रंगांनी रंगविलेल्या या दिव्यांची चर्चा अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्याबाहेरही पसरली. गोवा, हरियाणा, पुणे, मुंबई नाशिक या भागातुनही दिव्यांची मागणी आली. सर्व मिळून एक लाख दिव्यांची ऑर्डर मिळाल्याने गोकुळ अगदी बहरून गेले आहे. कुणी माती जमा करायची, कुणी शेण जमा करायचे. अवती-भोवती पहाड आणि झुडपी जंगल असणाऱ्या गोकुळात रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत दिवे बनविले जात आहेत.
लाख दिव्यांचे टार्गेट पूर्ण-
दिवस उजडताच रात्री घडविलेले दिवे उन्हात सुकायला ठेवले जातात. या कामात गुंजन गोळे यांचे पती अश्विन तळेगावकर यांचीही साथ मिळते. अडचणी अनेक असल्या तरी अंधारात जगणाऱ्यांना आयुष्याची नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंजन गोळे यांची जिद्द, मेहनत आणि गोकुळातील प्रत्येकाच्या हातभरामुळे लाख दिव्यांचे टार्गेट पूर्णत्वास जात आहे.
आम्हाला पुढच्या वर्षीच्या दिवाळीसाठीही आतापासून ऑर्डर मिळायला लागली आहे. यावर्षी दिवाळी पूर्ण होताच आठ दिवसांनी आम्ही पुन्हा कामाला लागू. अमरावती जिल्ह्यातील 100 महिलांना यामध्यमातून रोजगार मिळावा, यासाठीही माझे प्रयत्न असल्याचे गुंजन गोळे ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. एचआयव्ही पॉझिटिव्ह असणाऱ्यांबाबत समाजाने पॉझिटिव्ह भावना जपावी, अशी अपेक्षाही गुंजन गोळे यांनी यावेळी व्यक्त केली.