अमरावती : अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथे सोमवारी सायंकाळी किरकोळ वादावरून झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण बारा आरोपींना अटक केली आहे. अजूनही काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
काय आहे प्रकरण? : अंजनगाव सुर्जी पासून चार किलोमीटर अंतरावरील लखाड या गावात सोमवारी सायंकाळच्या दरम्यान गावातील मशिदीजवळ दोन समाजातील मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादात दोन्ही समाजातील मंडळी आमने सामने आल्याने भांडणाचे रुपांतर प्रचंड हाणामारीत झाले. यामुळे येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे लखाड गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच गावात पोहचून ही दंगल आटोक्यात आणली. या घटनेत दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल : या प्रकरणी पोलिसांची रात्रीपासून धरपकड सुरू असून आतापर्यंत लखाड येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यासह एकूण बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही दंगल गावात लावलेल्या झेंड्यावरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या दोन चार दिवसापासून लखाड गावात झेंड्यावरून वाद सुरू होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी रात्रीच लखाड गावात भेट देऊन शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली.