अमरावती :अमरावती जिल्ह्यातील लसीकरणं हे लस उपलब्ध नसल्याने बंद पडले होते.त्यानंतर बुधवारी अमरावती जिल्ह्यासाठी 28 हजार डोज प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पून्हा लसीकरण केंद्र सुरू झाले. तिवसा शहरात देखील बंद पाडलेले लसीकरण केंद्र आज सुरु झाले खरे पण लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा जबर फटका पहिल्याच दिवशी बसला आहे.
हेही वाचा -लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांना भीती, लसीकरणाला गर्दी
दुसऱ्या डोसचे आज लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्यासाठी तालुक्यातील शेकडो नागरिक हे डबल डोस घेण्यासाठी आले होते. मात्र, प्रशासनाच्यावतीने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची कोणतीही सोय केली नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच लसीकरण घेतल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिट विश्रांतीची गरज असते. परंतु, त्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. दरम्यान, हा संपूर्ण गोंधळ लसीकरण केंद्राचे ठिकाण बदलवण्यात आल्याने झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.