अमरावती- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. त्यातच बिहारी कामगारांना महत्त्व देऊन त्यांची राहायची व्यवस्था केली जात आहे. बाजार समितीतील कामगारांचे प्रतिनिधी बंडू वानखेडे यासाठी जबाबदार असल्याचा आरोप माथाडी व मापारी कामगार संघटनेने केला आहे. समितीत सुरू असणाऱ्या अयोग्य या कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानिक कामगारांना काढून बिहारींना काम हेही वाचा-'त्या' आंदोलक शेतकऱ्याची भाजपवर भिस्त.. आजी मुख्यमंत्र्यांकडून न्याय न मिळाल्याने माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट बंडू वानखेडे यांनी माथाडी व मापारी कामगार संघटनेला कुठलीही पूर्वसूचना न देता 13 जानेवारीला 14 मापारी कामगारांच्या जागांवर नवीन कामगार नेमण्याचा आदेश काढला आहे. बाजार समिती खरेदी विक्री अधिनियम 1963,1967 च्या तरतुदीनुसार मापारी परवानाधारक असल्यामुळे त्यांना असे अचानक काढता येत नाही. कुठलीही तक्रार या कामगारांबद्दल नसताना नियमबाह्य पद्धतीने त्यांचा परवाना रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली. त्यांच्या जागेवर नवीन कामगार नेमण्यात आले. 15 ते 20 वर्षांपासून परवानाधारक मापारी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर हा अन्याय असल्याचा आरोप मापारी कामगार संघटनेने केला आहे.
बंडू वानखेडे यांनी शंभर हमाल कामगारांचे बोगस परवाने तयार केले असल्याचा आरोप अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच मापारी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पवार यांनी केला आहे. आम्ही याबाबत बाजार समितीकडे तक्रार केली असता बंडू वानखेडे यांनी राजकीय दबाव आणून सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार हे बाजार समितीवर आपला प्रतिनिधी आपल्याला न्याय मिळवून देईल या आशेने निवडून देतो. मात्र, बंडू वानखेडे ही व्यक्ती कामगारांच्या जीवावर उठली असल्याचे रघुनाथ पवार यांनी म्हटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असणारे कामगारविरोधी धोरणाबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदन सादर करून बंडू वानखेडे यांचे कामगार प्रतिनिधी पत्र रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. बाजार समितीत सुरू असणाऱ्या कारभाराकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, खासदार नवनीत राणा यांनी लक्ष द्यावे. कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मापारी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पवार यांनी केली आहे.