अमरावती- दरवर्षी कपाशी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यात दोन वर्षांपासून गुलाबी बोंडअळीने थैमान घातल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळी व कपाशीवरील इतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिसंस्था केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरच्या वतीने दरवर्षी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी चक्क कीर्तन व भारुडाच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते.
अमरावतीच्या मोझरीत 'कृषी कीर्तन' अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतकऱ्यांना कीर्तन व भारुडाच्या माध्यमातून माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड व वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ शैलेश गावंडे यांनी कीर्तनकाराचा वेष परिधान करून शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापण विषयी जनजागृती केली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून कीर्तन व भारुड या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने माहिती मिळावी म्हणून हा कृषी कीर्तनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम संत नगरी गुरुकुंज मोझरीत राबवण्यात आला.
केंद्र शासन पुरस्कृत “कीटक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन, गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन रणनीतींचा व प्रसार” या प्रकल्पांतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात तिवसा तालुक्यातील शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या कृषी कीर्तन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्थेद्वारा विकसित कापूस शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच कापूस उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान, गुलाबी बोंडअळी चे एकात्मिक व्यवस्थापन, कीडनाशकांचा सुरक्षित वापर, कपाशीवरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात येईल. ही तांत्रिक व शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना सहज समजेल, अशा साध्या सोप्या भाषेत कविता, लोकगीते, भारुड इच्या स्वरूपात "कृषी कीर्तन" या नावीन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्याचा राज्यात प्रथमच अशा प्रयत्न कीटक शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड आणि वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ शैलेश गावंडे यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांना शेतात नेऊन मार्गदर्शनही करण्यात आले.
हेही वाचा -अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीदरम्यान राडा; महर्षी पब्लिक स्कूलवर कठोर कारवाईची मागणी