अमरावती- पंढरपूर येथे दरवर्षी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याला राज्य व परराज्यातील हजारो पालख्या येत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ काही मानाच्या पालख्यांनाच परवानगी मिळाली आहे. त्यातच विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीलाही पवानगी दिली.
ठरलं..! कौंडण्यपुरातील रुक्मिणीची पालखी जाणार पंढरीला... - amravati news
सुरुवातीला माता रुक्मिणीच्या पालखीला परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला होता. त्यामुळे कौंडण्यपूर देवस्थान व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पंढरपूर मंदिर प्रशासन व राज्य सरकारशी पत्र व्यवहार केला.
सुरुवातीला माता रुक्मिणीच्या पालखीला परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला होता. त्यामुळे कौंडण्यपूर देवस्थान व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पंढरपूर मंदिर प्रशासन व राज्य सरकारशी पत्र व्यवहार केला. त्यानंतर राज्य सरकारने व पंढरपूर मंदिर प्रशासनाने कौंडण्यपूरच्या पालखीला परवानगी दिली आहे. यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगीचे पत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल रूख्माई संस्थानच्या विश्वस्तांना पाठवले आहे. आषाढी यात्रेचा कालावधी 22 जून ते 5 जुलै असा राहणार आहे. माता रुक्मिणीची पालखी घेऊन जाणाऱ्या भाविकांची नावे मंदिर समितीस कळविण्याबाबत पत्र संस्थानला देण्यात आले आहे.
आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त 1 जुलै रोजी पंढरपूर येथे यात्रा भरणार आहे. यात्रेत प्रमुख संतांच्या पादुकांचा पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन पालख्यांवर काहीशी मर्यादा आली. मात्र, महत्वाच्या पालख्यांना योग्य ती दक्षता घेऊन पालखी आणण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, राज्यात नऊ पालख्यांना मान्यता देण्यात आली आहे.
कौंडण्यपूर येथील साडे चारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहणार आहे. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.