अमरावती:पांडवांनी अज्ञातवासात असताना आपली सर्व शस्त्र शमीच्या झाडावर लपवून ठेवले असल्याचा उल्लेख महाभारतात आहे. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमीच्या झाडावर सुरक्षित असणारे शस्त्र घेतल्यावर त्या शस्त्रांची झाडाखालीच पूजा केली. तेव्हापासून दसऱ्याच्या पर्वावर शमीच्या वृक्षाच्या पानांची पूजा केली जात आहे. भारतात झालेल्या आणि जगभर गाजलेल्या चिपको आंदोलनाची पहिली ठिणगी ही शमीच्या झाडाला वाचवण्यासाठी पडली होती. भारतात धार्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या शमीच्या झाडाला युनायटेड अरब अमिरात येथे देखील अतिशय महत्त्व आहे.
शमीसाठीच झाले पहिले चिपको आंदोलन:राजस्थानमध्ये शमीच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे. 1730 मध्ये जोधपुर जवळ असणाऱ्या खेजरली नावाचे गाव आहे. त्यावेळी तेथील राजा अभयसिंग यांना महाल बांधायचा असल्यामुळे, त्यांच्या राज्यात खेचरली गावाजवळ असणारे जंगल कापण्याचे आदेश त्यांनी दिले. या जंगलात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शमी वृक्षांची कत्तल केली जाणार होती. ती रोखण्यासाठी तेथील बिश्नोई समुदायाच्या महिलांनी सर्वात आधी विरोध केला. बिश्नोई समाजातील अमृता देवी या महिलेसह तिच्या तीन मुली शमीचे झाड तोडू नये म्हणून झाडाला चिपकल्या.राजाच्या सैनिकांनी मात्र त्या चौघींनाही क्रूरपणे ठार मारले.
363 लोकांना मारून टाकले: यानंतर गावातील सर्व लोक वृक्ष वाचवण्यासाठी झाडांना चिपकले. त्यावेळी राजाच्या सैनिकांनी 363 लोकांना मारून टाकले. प्रजेचा रोष पाहता राजाने त्या भागात महाल बांधण्याचा निर्णय मागे घेतला. शमी वृक्षाला वाचविण्यासाठी झालेले ते आंदोलन अतिशय महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे 1970 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी वृक्ष संवर्धनासाठी जे चिपको आंदोलन सुरू केले, त्याची प्रेरणा ही शमी वृक्षाला वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनातूनच मिळाली असल्याचे डॉ. अर्चना मोहोड यांनी सांगितले.
राजस्थान आणि तेलंगणाचे आहे राज्यवृक्ष: शमी या झाडाला धार्मिक महत्त्व देखील आहे. कर्नाटक राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात या झाडाला खूप महत्त्व आहे. राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांचे शमी हे राज्यवृक्ष आहे. कर्नाटकात दहा दिवस दसरा उत्सव साजरा होतो, त्या उत्सवात शमीच्या झाडाला फार महत्त्व आहे. या झाडाची पूजा केली जाते. दसऱ्याच्या पर्वावर महाराष्ट्रात देखील शमीच्या झाडाच्या पानांची पूजा केली जाते.
यूएई चा राष्ट्रीय वृक्ष: यूएई अर्थात युनायटेड अरब अमीरात या देशाचा शमी हा राष्ट्रीय वृक्ष आहे. यूएई मधील भारी नावाच्या प्रदेशात शमीचे 400 वर्ष जुने झाड आहे. या झाडाला ऐतिहासिक महत्त्व असून दरवर्षी एक लाख लोक हे झाड पाहण्यासाठी जातात. ट्री ऑफ लाईफ असा उल्लेख युएई मध्ये शमीचा केला जातो. या झाडाचा उल्लेख स्टीव्ह मार्टिनचा हॉलीवुड मधील चित्रपट एल ए स्टोरीमध्ये देखील आहे.