अमरावती - विदर्भाची कुलदैवत आणि अमरावतीची ग्रामदैवत असणारी अंबादेवी सुमारे 5 हजार वर्षांपासून अमरावतीत आहे. पूर्वी गावाबाहेर असणारे आणि आज शहराच्या मध्यभागी असलेले अंबामातेचे अतिप्राचिन मंदिर आहे. अंबामातेच्या मंदिराशेजारीच एकवीरादेवीचेही मंदिर आहे. अमरावती शहराचे नाव अंबामातेच्या नावावरूनच पडले, असे मानले जाते.
नवसाला पावणारी अमरावतीची आंबादेवी ही ऐतिहासिक पुरव्याद्वारे 1097च्या पूर्वीपासून स्वयंभू मूर्ती स्वरुपात स्थानापन्न असावी आणि त्या काळात अंबादेवीचे भव्य सुवर्ण मंदिर असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. अंबामातेची मूर्ती बेसॉल्ट दगडाची आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अंबादेवीची मूर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात स्थानापन्न होती. पूर्वेकडे दरवाजा असलेले हे मंदिर अतिशय लहान होते. मंदिराच्या चोहीकडे दगडाच्या भिंती होत्या. मंदिराचा गाभारा पण लहान होता. आंबदेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या पाषाणात असून ही पूर्णाकृती मूर्ती आसनस्थ आहे. दोन्ही हात मांडीवर विसावलेले, डोळे अरधोनमिलीत, शांत, गंभीर, ध्यानस्थ मुद्रा धारण केलेल्या मूर्तीचे हात व पाय अतिशय बारीक आहेत.
अंबादेवी सुवर्ण मंदिर लुटले यवनांनी
यवनांनी1499मध्ये वऱ्हाडवर कब्जा केला. त्यावेळी अनेक मंदिरांपैकी अंबादेवीचा सुवर्ण मंदिरही त्यांनी लुटले. अंबादेवीच्या गाभाऱ्यात मात्र ते पोहचू शकले नाही, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. 1630 साली देवीचे भक्त जनार्दन स्वामी यांनी अंबादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी अंबादेवी मंदिरालगत एकविरादेवी मंदिराची स्थापना केली. विशेष म्हणजे एकवीरादेवीला मोठ्या देवीचा आणि अंबादेवीला लहान देवीचा मान आहे. 1898 साली मंदिराची मोठी दुरुस्ती अमरावतीकरांनी केली.