अमरावती - जुन्या वैमनस्यातून मंगळवारी एका युवकाला न्यू प्रभात कॉलनी परिसरलगत अडवून दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. विशेष म्हणजे चाकू मारणाऱ्यांपैकी एकाने राजापेठ पोलीस ठाणे गाठून आपणास मारहाण झाली, तक्रार नोंदवा, अशी विनंती केली. मात्र, याच वेळी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला दोन युवकांनी पोलीस ठाण्यात आणल्याने चांगलीच खळबळ उडाली. भूषण रमेश वारकर(27) रा. सुशील नगर असे जखमी युवकाचे नाव आहे.
जुन्या वैमनस्यातून युवकावर चाकू हल्ला, दोघांना अटक - चाकूने वार
मंगळवारी भूषण रमेश वारकर या युवकावर दोघांनी न्यू प्रभात कॉलनी परिसरात चाकूने वार करून पळ काढला. नंतर चाकू मारणाऱ्यांपैकी एकाने पोलीस ठाणे गाठून आपणास मारहाण झाल्याची तक्रार नोंदविण्याची विनंती केली. त्याच वेळी जखमी भूषणही तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आरोपिला ओळखत त्यानेच चाकूने वार केल्याचे म्हटले.
भूषणवर दोन जणांनी मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास न्यू प्रभात कॉलनी परिसरात चाकूने वार करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भूषणने रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवकांना मदत मागितली. दुचाकीस्वार युवक भूषणला गाडीवर बसवून दवाखान्यात जाण्यासाठी निघाले असताना भूषणाने त्यांना आधी पोलीस ठाण्यास चला, अशी विनंती केली. राजपेठ पोलीस ठाण्याला येताच जखमी भूषण दुचाकीवरून खाली पडला. पोलीस आणि काही युवकांनी भूषणला उचलले आणि आधी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्यास निघाले असता पोलीस ठाण्यात आधीच आलेल्या युवकाला पाहून यानेच चाकू मारला, असे भूषण ओरडला. पोलिसांनी लगेच त्या युवकाला पकडले आणि त्याच्याकडून चाकूही जप्त केला. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी भय्या यादव आणि निखिल गजभिये या दोन आरोपींना अटक केली आहे.