अमरावती -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी नोटीस दिली आहे. बुधवारी 8 जून रोजी वांद्रे पूर्व मुंबई न्यायालयात हजर राहण्याचे आदेश खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप आडे यांनी त्यांना बजावले ( Khar police notice to Rana couple ) आहेत. मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट केल्या ( Hanuman Chalisa Controversy ) होता. या प्रकरणात राणा दाम्पत्याविरोधात कलम 353, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खार पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यावर आता राणा दाम्पत्याला न्यायालयातच हजर राहण्याचे आदेश प्राप्त झाले आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे 23 एप्रिलला अमरावती वरून मुंबईला गेले होते. 24 एप्रिल रोजी राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पटवण्यासाठी निघाले असताना त्यांच्या मुंबईतील खार परिसरात लावी बिल्डींगच्या आठव्या माळ्यावर पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना बजावले असतानाच त्यांच्या निवासस्थानी शेकडो शिवसैनिक एकत्रित आले होते. राणा दाम्पत्याच्या हट्टामुळे मुंबईतील कायदे व्यवस्था धोक्यात आल्यामुळे पोलिसांनी राणा दाम्पत्य विरोधात विरोधात कलम 353, 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. वांद्रे येथील न्यायालयाने राणा दाम्पत्याला चौदा दिवसांची कोठडीही ठोठावली होती.