महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौंडण्यपूरमधील कार्तिकी महोत्सव रद्द, यंदा दिंडी आणि दहीहंडी नाही - kaundanyapur latest news

कार्तिकी एकादशीला कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीचे मंदिर बंद राहणार आहे. तसेच ३० आणि १ तारखेला होणारा दिंड्याचा रिंगण सोहळा आणि दहीहंडीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने परिपत्रक काढले असून भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

kaundanyapur latest news
कौंडण्यपूरमधील कार्तिकी महोत्सव रद्द

By

Published : Nov 26, 2020, 11:47 AM IST

अमरावती - माता रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाचे पंढरपूर असलेल्या कौंडण्यपूर येथे शेकडो वर्षांपासून कार्तिकी एकादशीचा सोहळा होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीला कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीचे मंदिर बंद राहणार आहे. तसेच ३० आणि १ तारखेला होणारा दिंड्यांचा रिंगण सोहळा आणि दहीहंडीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने परिपत्रक काढले असून भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्तिक एकादशीवरही कोरोनाचे सावट

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेरघर मानले जाते. दरवर्षी येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. त्यासाठी विदर्भातून मोठ्या प्रमाणावर लाखो विठ्ठलभक्त हे कौंडण्यपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नाही तर ३० आणि १ तारखेला होणारा दहीहंडी व गोपाळकाल्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी कोणीही न येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

कौंडण्यपूरमधील कार्तिकी महोत्सव रद्द
श्रीरामांच्या आजीचेही माहेर
या गावी श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर होते. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. तेथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा सुमारे ४१८ वर्षे जुनी आहे. हे ठिकाण विदर्भनंदन राज्याची राजधानी होते. रामाची आजी म्हणजेच अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई),अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगिरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर 'कौंडण्यपूर' हे होते. नल व दमयंतीचा विवाह देखील येथेच झाला. येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते अशी आख्यायिका आहे.
कौंडण्यपूरला कार्तिक एकादशीचे महत्व
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो भाविकांचा मेळा भरत असतो. तर दिवाळी नंतरच्या कार्तिकी एकादशीला लाखो भक्त हे कौंडण्यपूरला कार्तिकी महोत्सवासाठी दाखल होत असतात. येथे शासकीय महापूजादेखील पार पडते.
यंदा आठ दिवस चालणारी यात्राही रद्द
कौंडण्यपूरमध्ये कार्तिकी महोत्सवादरम्यान आठ दिवस मोठी यात्रा भरत असते. परंतु यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली. पूर्वी यात्रेमध्ये मोठे कार्यक्रम पार पडत होते. परंतु अलीकडच्या काळात या प्रथा बंद करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details