कलालकुंड-बकादरी धबधब्याचा सुंदर नजारा अमरावती :सातपुडा पर्वत रांगेत 'कलालकुंड-बकादरी' हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. मेळघाटातील अतिशय सुंदर असणाऱ्या या धबधब्याच्या ठिकाणाला 'कलालकुंड आणि बकादरी' अशी दोन नावं आहेत. या धबधब्याच्या परिसरात बकादरी नावाच्या देवाचं स्थान आहे. या ठिकाणी परिसरातील गावातील आदिवासी बांधव पूजा करण्यासाठी येतात, नवस फेडतात. आदिवासी बांधव या परिसराला बकादरी म्हणूनच संबोधतात, तर इतर लोक याला कलालकुंड असं म्हणतात. या एकाच धबधब्याला ही दोन नावं आहेत. कलालकुंड-बकादरी अशी दोन्ही नावं एकाचवेळी घेण्याचं प्रचलित आहे.
धबधबा पाहण्यासाठी थरारक प्रवास :चिखलदऱ्याकडे जाताना डाव्या हाताला जामलीवन नावाचे गाव आहे. या गावापासून काही अंतरांवर जांभळीवन हे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून डाव्या हातावर अर्धा किलोमीटर आतमध्ये हे गाव आहे. या गावाच्या दुसऱ्या टोकावर असणाऱ्या तलावापासून कलालकुंड बकादरी धबधबा दोन किलोमीटर लांब आहे. तलावापासून धबधब्याच्या दिशेनं पायी चालतच प्रवास करावा लागतो. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात काही अंतरापर्यंत चालत गेल्यावर खळखळून वाहणारी नदी लागते. ही नदी पायी चालून पार करावी लागते. त्यानंतर पुढे एक पहाड चढल्यावर सपाट मैदान लागते. या मैदानावर असणारी शेती पार केल्यावर सुमारे एक किलोमीटर अंतराची खोल दरी पायवाटेनं उतरावी लागते. खाली उतरल्यावर सापन नदीचं भव्य रूप पाहायला मिळतं. ही नदी पुढे जावून खोऱ्यात कोसळते. ते खोरे नदीच्या काठावरून खाली पाहताना अतिशय सुंदर धबधबा पाहायला मिळतो.
जाणकार सोबत नेणं गरजेचं :कलालकुंड-बकादरी धबधबा अतिशय घनदाट जंगलात आहे. या ठिकाणी वाघ, अस्वल, बिबटे अशी जंगली श्वापदं आहेत. यामुळे ह्या भागात जाताना मोठे धाडस करावे लागते. यासह या परिसराची संपूर्ण माहिती असणाऱ्या जाणकार व्यक्तीला सोबत नेणं, हे पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हा धबधबा वरून खाली कोसळताना दिसतो. मात्र, वरून कोसळताना पाहण्यासाठी या ठिकाणी पहाडात असणाऱ्या कपारीतून काही अंतरापर्यंत जाता येतं. मात्र, हे अतिशय धोकादायक आहे. या ठिकाणी जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनातूनच पुढे जाणं योग्य असल्याचे जांभळीवन येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल झामरकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
दऱ्याखोऱ्यातून प्रवास : 'कलालकुंड-बकादरी' हा सुंदर धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना दोन किलोमीटर दऱ्याखोऱ्यातून प्रवास करावा लागतो. तसंच धबधब्याच्या परिसरात वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या नदीमध्ये तास-दोन तास मनसोक्त आंघोळ केल्यावर प्रचंड भूक लागते. भूक लागल्यावर परतीचा प्रवास अतिशय कठीण आहे. त्यामुळं या ठिकाणी जाताना सोबतच खाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
- Exclusive : धबधब्यावरून कोसळलेल्या आयटी इंजिनियरच्या शोधासाठी 'ड्रोन'ची मदत; ७ दिवसांनी मृतदेह लागला हाती
- Rautwadi Waterfall Radhanagari : राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला; पाहा ड्रोनद्वारे धबधब्याचे मनमोहक दृश्य
- माहूरमध्ये निसर्गाची मुक्त उधळण; ओसंडून वाहतोय वझरा धबधबा