अमरावती -राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेक ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. असे असले तरी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मात्र जिल्ह्यातील दर्यापूरमधील आमदारांच्या वाढदिवसाला उपस्थिती लावून महिलांना साड्याचे वाटप करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप जिजाई प्रतिष्ठानच्या जिल्हा अध्यक्षांनी केला आहे.
दरवर्षी राबवला जातो उपक्रम
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांना साड्या वाटपाचा उपक्रम राबवला जातो. यंदाही हा उपक्रम पार पाडण्यात आला. एकीकडे कोरोनाकाळात सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असतानाही आमदारांनी कसा कार्यक्रम घेतला, असा सवाल जिजाई प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.
शासकीय नियम आहे कुठे?
एकीकडे कोरोनारुग्णांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परंतु दुसरीकडे सत्तेतील आमदार आणि पालकमंत्री अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करत असतील तर शासकीय नियम कुठे आहे, हा प्रश्न उपस्थित होते. ग्रामीणभागात आचारसंहिता असताना अशाप्रकारे साडीवाटप कसे घेऊ शकता, असा सवालदेखील जिजाई प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.