अमरावती- सातपुडा पर्वत रांगेतून अनेक वळणे घेत हिरव्याकंच जंगलातून धावणारी 'जंगलची राणी', अशी ओळख असणारी 'मीटर गेज रेल्वे' ३१ डिसेंबर २०१६ पासून बंद झाली आहे. या मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर होणार, असे सांगितले जात असताना हा मार्ग मेळघाट बाहेरून मध्यप्रदेशात नेण्याबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला कळविल्याने हा विषय सध्या चांगलाच तापला आहे. एकूणच ब्रॉडगेजच्या पेचात जंगलाची राणी सापडली असल्याने तिचा मार्ग नेमका कधी आणि कोणत्या मार्गाने मोकळा होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्वातंत्र्यानंतर रेल्वेचे जाळे वाढत असताना उत्तर भारताला अगदी कमी अंतरात दक्षिणेशी जोडणारा मध्यप्रदेशातील खांडवा ते मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असणाऱ्या पूर्णा रेल्वे स्थानकापर्यंत जाताना सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटातून जाणारा मिटर गेज रेल्वे मार्ग निर्माण झाला. १९५५ साली सुरू झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम अवघ्या ५ वर्षात पूर्ण होऊन २ जानेवारी १९६१ रोजी मेळघाटातून रेल्वे गाडी धावायला लागली. मेळघाटात या मार्गावर धुळघाट रेल्वे गावालगत चढवाची ८० मिटरची उंची गाठण्यासाठी रेल्वे मार्ग एका पहाडाला वळसा घालून उंचावर नेण्यात आला आहे. असे करताना रुळांना देवनागरीतील ४ चा आकडा प्राप्त झाला आहे. संपूर्ण भारतात रुळांचा हा चारचा आकडा पाहण्यासाठी पर्यटक धुळघाटला येतात.
१९६१ ते २०१५ पर्यंत पूर्णा पासून खडवा पर्यंत या मार्गावर दिवसातून ४ वेळा गाडी धवायची. खंडव्याच्या समोर ओंकारेशवर, इंदोर आणि पुढे राजस्थानला तसेच पूरणाच्या पलीकडे परभणी आणि पुढे हैद्राबादला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अतिशय उपायुक्त ठरणारी होती. २०१५ नंतर ही गाडी अकोला स्थानकावरून खांडवा स्थानकापर्यंत धावायला लागली. या मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर होणार असे सांगून ही गाडी ३१ डिसेंबर २०१६ पासून बंद झाली आहे.
अकोला- खंडवा हा मीटर गेज रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करण्याचा विषय सर्वात आधी २०११ मध्ये समोर आला. त्यावेळी केंद्र शासनाने मेळघाटातील जंगलातून जाणाऱ्या जुन्या मार्गाएवजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथून आडगाव, हिवरखेड पुढे बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सोनाळा, टूनकी जामोद मार्गे मध्यप्रदेशात येणारा काहीसा जंगल परिसर येथून मध्यप्रदेशातील तुकाइथड या स्थानकापर्यंत हा नवा पर्यायी मार्ग सुचवला होता. विशेष म्हणजे, तुकइथड हे रेल्वे स्थानक धुळघात रेल्वेनंतर दुसरे रेल्वे स्थानक असून धारणी पासून २६ किमी अंतरावर आहे. रेल्वे प्रशासनाने मेळघाटातून गाडी नेऊच नये यासाठी वन्यजीव प्रेमींनी हा मार्ग ब्रॉडगेज होऊ नये म्हणून पहिल्यांदा विरोध केला.
२०११ पासून २०१६ पर्यंत वन्यजीव प्रेमींच्या विविध संघटनांचे आंदोलन अकोट परिसरात सुरू होते. २०१६ मध्ये ही गाडी बंद झाल्यापासून वातावरण शांत असताना आता २ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाची बैठक घेऊन पूर्णा ते खांडवा या मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करताना ही गाडी अकोट रेल्वे स्थानकावरून हिवरखेड, सोनाळा, टूनकी, जामोद मार्गाने न्यावी, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. पर्यावरणाची किंमत मोजून, जंगलाचे नुकसान करून प्रकल्प राबविन्यासाठी सोपा मार्ग निवडण्यात येऊ नये, त्यामुळे अकोला खांडवा मिटर गेज रेल्वे लाईन ब्रॉड गेजमध्ये परिवर्तित करण्याचा प्रस्ताव आला. तेव्हा मेळघाटमधून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग बदलण्याचे राज्याचे मत केंद्र शासनाला कळविले. हा पर्यायी मार्ग निवडल्यास वाघ व वन्यजिवांचे संरक्षण होईल, सोबतच पर्यायी मार्गाद्वारे बरीचशी नागरी वस्ती कव्हर होऊन त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे वन्यजीव प्रेमींनी स्वागत केले असताना आणि हा मार्ग मेळघाट बाहेरूनच व्हायला हवा, यासाठी बुलडाणा जिल्ह्यात विविध संघटनांचे आंदोलन सुरू झाले असताना अमरावती जिल्ह्यातही हा विषय आता तापायला लागला आहे. मेळघाटातून धावणाऱ्या या गाडीबाबत प्रत्यक्ष मेळघाटातील धुळघात रेल्वे गावचे सरपंच राम भिलावेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना आम्हाला अकोट, अकोला आणि खांडवा ही बाजारपेठ अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा माल अकोला आणि खांडवाकडे नेण्यास ही गाडी अतिशय सोयीची होती. ही गाडी आता त्वरित सुरू व्हावी आणि सोबतच विद्युत पुरवठा मिळावा, असेही राम भिलावेकर म्हणाले.
ही गाडी आमच्यासाठी फायद्याची होती. अगदी अल्प तिकीट दारात या गाडीने आम्ही अकोट, अकोल्याला जात होतो. आज अकोट जाण्यासाठी २०० रुपये आणि अकोल्याला जायला ५९९ रुपये लागतात, असे धुळघात रेल्वे येथील देवीच्या मंदिरात पुजारी असणारे राजू कुलकर्णी म्हणाले. गाडी धवायची तेव्हा शाळेचे शिक्षक वेळेवर शाळेत येत असत. गाडी बंद झाल्यापासून सगळेच नुकसान झाले असल्याचेही राजू कुलकर्णी म्हणाले.
धारणीत जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. आम्हाला आमच्या गावात रेल्वेगाडी हवी आहे. असे धुळघात रेल्वे येथील युवक निलेश यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. धारणीवरून अमरावती अंतर १४० किमी असून घाट उतरून जायला एकूण ५ तास लागतात. अकोट, अकोला, खांडवा जायला केवळ १ तास लागतो, असे दुनी येथील पंचायत समिती सदस्य तारासिंग कासदेकर म्हणतात. मेळघाटातील रुग्ण आदिवासी अमरावतीत ५ तास अंतर कापून यायला घाबरतात. ५ तासाच्या प्रवासात काय होईल याची शाश्वती नाही. तसेच, अमरावतीत कोणी मदत करीत नसल्याने आम्हाला रुग्णांना घेऊन अकोला आणि खांडवा जायला परवडते. या शहरातून आम्ही दिवसभरात परतू पण शकतो. यामुळे आमच्यासाठी अकोला ते खांडवा ही गाडी मेळघाटातून जाणे गरजेचे असल्याचेही तारासिंग कासदेकर म्हणाले.
मेळघाटातील आदिवासी हे सहनशील आहेत. इतर ठिकाणी जंगलातून रेल्वे मार्ग गेले आहेत. असे असताना रेल्वे गाडी बंद करून मेळघाटातील आदिवासींवर अन्याय करण्याचा हा प्रकार असल्याचे धारणी येथील रहिवासी अप्पा पाटील म्हणाले. या गाडीसाठी आम्ही आंदोलन उभारू. आमच्यासोबत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि मध्यप्रदेशातील लोकप्रतिनिधीसुद्धा असल्याचे अप्पा पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. मेळघाटातून जाणारी रेल्वेगाडी ही आदिवासींची लाईफलाईन आहे. ही गाडी म्हणजे आदिवासींच्या विकासाचा मार्ग असून जुन्या मार्गाचेच ब्रॉडगेज व्हावे, असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांचे म्हणने असून आम्ही पक्ष म्हणून नव्हे, तर आपल्या जिल्ह्यातील आदिवासींचा प्रश्न म्हणून आंदोलन छेडणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.