अमरावती - 'कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. कोरोनाकाळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिले. अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग-व्यायामाबरोबरच सकारात्मकता, तसेच 'हेल्दी थिकिंग'ची आवश्यकता असते. त्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस हेल्थ ॲप्लिकेशन व इतर उपक्रम महत्वपूर्ण ठरतील. यापुढेही दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल', असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
अमरावती पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे आशियाना क्लब, जोग क्रीडा संकुल, पोलीस अधीक्षक कार्यालय नूतनीकरण तसेच पोलीस हेल्थ ॲपचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी (20 जून) झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
12 बोलेरो, 18 दुचाकींचा पोलिसांच्या ताफ्यात समावेश
आशियाना क्लब येथे व्हीआयपी कक्ष, विश्राम कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, पुरुष व महिला बराक, ग्रामीण अधिकारी, अंमलदारांसाठी मेस, स्मृतिभवन, उपाहारगृह, तर जोग स्टेडियम येथे वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, हॉलीबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मंथन सभागृह, अन्नपूर्णा मेस, बॉईज बराक, 400 मीटर ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट आदी विविध सुविधांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. श्रीमती श्वेता के. हरी बालाजी यांनी या सुविधांच्या नूतनीकरण व निर्मितीसाठी योगदान दिले आहे. 12 बोलेरो व 18 दुचाकींचा अमरावती पोलिसांच्या ताफ्याचा समावशे करण्यात आला. याचा शुभारंभही यावेळी ठाकूर यांच्या हस्ते झाला.
'पोलिसांबाबतच्या चांगल्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही'
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, की 'जिल्हा पोलीस दलातर्फे कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुलात सभागृह, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाखाणण्यासारखे आहे. यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबवला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांचे आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी ॲपसह हे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेक उपक्रमांना पोलीस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही'.
हेही वाचा -Pratap Sarnaik Issue : प्रताप सरनाईक यांची भूमिका सच्च्या शिवसैनिकाचीच भावना - चंद्रकांत पाटील