महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत बँक खातेदारांकडून रोकड पाळविणारी टोळी सक्रिय; दोन घटनेत १ लाख ९ हजार रूपये लंपास - police

अमरावतीत बँक खातेदारांना बोलण्यात गुंतवून, पावती भरून घेण्याचा बहाणा करून त्यांच्या जवळील रक्कम लंपास करण्याच्या दोन घटना घडल्या.

बँकेबाहेरील छायाचित्र

By

Published : Jun 26, 2019, 3:16 PM IST

अमरावती- शहरात बँकांमध्ये दैनंदिन व्यवहार करणाऱ्या खातेधारांजवळील रोकड पाळविणारी टोळी सक्रिय झाली आहे. आज कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या बँक ऑफ इंडियात खातेदाराजवळील १ लाख आणि गुलशन टॉवरस्थित अॅक्सिस बँकेत खातेदाराकडील ९ हजार रुपये लंपास करण्यात आले.

बँकेबाहेरील दृश्य


बँकेत दैनंदिन व्यवहार करणाऱ्या खातेदारांवर पाळत ठेऊन त्यांच्याजवळ असणारी रक्कम लंपास करण्याची शक्कल या टोळीने लढविली आहे. बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झालेले नारोत्तम देविकिसन व्यास (वय ६७ वर्षे, रा. सिद्धिविनायक कॉलनी) हे आज दुपारी पैसे काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या जयस्तंभ शाखेत आले होते. त्यांनी बँकेतून ९९ हजार रुपये काढून जवळचे एक हजार रुपये टाकून १ लाख रुपये हँडबॅगमध्ये ठेवले. यावेळी त्यांना एका नातेवाईचा त्यांना फोन आल्याने ते बँकेत बेंचवर बसून बोलत होते. यावेळी एक महिला बँकेतील इतर खातेदारांना स्लीप भरून मागत होती. नातेवाईकांशी भ्रमणध्वनीवर बोलून झल्यावर नारोत्तम व्यास यांनी जवळची हँडबॅग बाजूला ठेऊन त्या महिलेला स्लीप भरून दिली. दरम्यान चोरट्याने बेंचवर असणारी पैशांची बॅग पळविली. आपले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच नारोत्तम व्यास यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.


दुसऱ्या घटनेत शहरातील फळांचे व्यापारी असीम राजा यांच्याकडे काम करणारे मोहम्मद अली अश्फाक अली हे नेहमी प्रमाणे व्यवसायातील रक्कम भरण्यासाठी दुपारी एक्सिस बँकेत गेले. २६ हजार ७०० रुपये भरण्यासाठी ते काउंटरवर उभे असताना त्यांना एका व्यक्तीने स्लिप भरून मागितली. अनोळखी व्यक्तीस स्लीप भरून देताना त्यांनी पैशांची बॅग बाजूला ठेवली. स्लीप भरल्यावर त्यांनी जवळची रक्कम कॅशियरला दिली असता त्यात ९ हजार रुपये कमी असल्याचे आढळून आले. आपल्याकडून स्लीप भरून घेणाऱ्यानेच हात साफ केल्याचे मोहम्मद अली अश्फाक अली यांच्या लक्षात येताच त्यांनीही शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. दोन्ही प्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details