अमरावती -कोरोना मृतदेहांवर येथील विलास नगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. आज (24 मे) एकूण 57 जणांच्या मृतदेहांची राख, अस्थी नेण्यासाठी कुणीही स्मशानात आलेले नाही. कोरोनाने प्राण गमावणाऱ्यांच्या अस्थी आणि राखेकडे रक्ताच्या नात्यांनीही पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत राखेने भरलेली पोती तशीच पडून आहेत.
दीड महिन्यांपासून विलास नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
कोरोनाने दगवणाऱ्यांच्या मृतदेहांवर शहरातील सर्वात मोठ्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीवरचा ताण कमी व्हावा म्हणून विलास नगर येथील स्मशानभूमीत दीड महिन्यांपासून कोरोना मृतांवर अंत्यविधी केला जात आहे.
राखेच्या पोत्यांवर लिहिले मृताचे नाव
ज्या कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणायत आले. त्यांची राख सावडायला त्यांचे कोणीही नातेवाईक आले नसल्याचे दिसले. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आदेशानुसार स्मशानभूमीत सेवा देणारे भालेराव यांनी प्रत्येकाची राख सावडून पोत्यात भरली आहे. अमरावती शहर तसेच जिल्ह्यातील धारणी, वरुड, चांदूर रेल्वे, अचलपूर तालुक्यासह वर्धा, नागपूर जिल्ह्यातील मृत व्यक्ती आणि मध्यप्रदेशातील काही शहरांतून अमरावतीत उपचारासाठी आल्याने मृत्यू झालेल्यांचीही राख या स्मशानात जपून ठेवली आहे. तर एका दाम्पत्याची राख एकाच पोत्यात भरून ठेवल्याची माहिती भालेराव यांनी दिली. शिवाय, त्या पोत्यावर ज्याची राख आहे त्याचे नावही लिहिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.