अमरावती -लेकिंनी सावित्री बनवण्या बरोबर मुलांनी ज्योतिबा बनवावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला व बालकल्याण विभागातर्फे सावित्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
चुकीच्या गोष्टींना ठाम नकार द्यायाचे धाडस करा-
सावित्रीबाई फुले यांची जयंती ही सावित्री उत्सव म्हणून साजरी करण्यात येत आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने महिन्यांपूर्वीच हा निर्णय घेतला. त्यानिमित्त अमरावती येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी प्रचंड सामाजिक अपमान पचवून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्या होत्या म्हणूनच आपण घडलो आहे. पण त्यांच्या पाठीशी ज्योतिबा फुले ठामपणे उभे राहिले होते. म्हणूनच त्या इतकं धाडस करू शकल्या आणि पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. हे विसरून चालणार नाही. तो काळ संपला असला तरी, या काळात केवळ त्याचे स्मरण करणे इतकीच औपचारिकता न ठेवता स्वतःवर आधी प्रेम करायला शिका, वैचारिक दृष्ट्या खंबीर व्हा आणि चुकीच्या गोष्टींना ठाम नकार द्यायाचे धाडस करा, असे मत महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.