अमरावती : 30-40 वर्षांपूर्वी पावसाळा सुरू झाला की गोगल गाय, देवगाय अशा विविध नावाने संबोधित केला जाणारा मऊ, मुलायम आणि दिसायला अतिशय सुंदर असा लाल रंगाचा मखमली किडा जिकडे-तिकडे दिसायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा किडा दुर्मिळ झाला आहे. तो आता पावसाळ्यात एखाद्या शेतशिवारात किंवा जंगलात क्वचितच दृष्टिक्षेपास पडतो. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अतिशय सुंदर अशा या मखमली किड्याचे जंगल संवर्धनात अतिशय महत्त्वाचे योगदान आहे.
विविध नावांनी ओळखला जातो : लाल भडक रंगाचा अतिशय नाजूक आणि जणू मखमल पांघरून असावा असा भास होणाऱ्या या किड्याला छोटेसे आठ पाय असतात. गोगलगाय, देवगाय अशी ह्या किड्याची ओळख असून संस्कृत भाषेमध्ये या किड्याला 'बीरबाहुती 'असे म्हटले जाते. उर्दूमध्ये हा किडा 'राणी किडा' या नावाने ओळखला जातो. तसेच मृग नक्षत्रात हा किडा आढळत असल्याने त्याला 'मृगाचा किडा' देखील म्हटले जाते.
वृक्षसंवर्धनात किड्याचे अनन्यसाधारण महत्व : हे मखमली किडे गोचीडासारखी माशा, नाकतोडे आणि इतर कीटकांना चिकटतात आणि आपले पोषण करतात. पूर्ण वाढ झालेले किडे पालापाचोळ्यावर वाढणाऱ्या बुरशी भक्षकांची अंडी खातात आणि अप्रत्यक्षपणे पालापाचोळा कुजविण्याच्या क्रियेला मदत करतात. पालापाचोळ्यावर वाढणाऱ्या बुरशीच्या भक्षकांची अंडी हा किडा खात असल्यामुळे बुरशी भक्षकांची संख्या कमी होण्यास मदत होते, आणि त्यामुळे बुरशी टिकून राहते. या किड्यामुळे झाडावरून खाली कोसळलेली पाने कुजण्यास मदत होते आणि यामुळे माती तयार होते. या मातीत झाडांच्या बिया रुजतात, ज्यातून नवे वृक्ष जन्माला येतात. अशाप्रकारे वृक्षसंवर्धनात या किड्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे.