अमरावती -जिल्हात कोरोनाग्रस्तांची वाढ होत असल्याने 22 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर दुकाने बंद आहेत. मात्र, टाळेबंदी ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अलीम पटेल यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेत 8 मार्चला अमरावतीमधील टाळेबंदी हटवली नाही तर 9 मार्चला टाळेबंदी विरोधात वंचित बहूजन आघाडी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.
...तर 9 मार्चला टाळेबंदी तोडो आंदोलन करू, वंचितचा इशारा - अमरावती टाळेबंदी बातमी
अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 मार्चपर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, टाळेबंदीत वाढ झाल्यास ते सहन करणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
सुरुवातीच्या टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. त्यात पुन्हा 14 दिवसांची टाळेबंदी लावण्यात आल्याने हे अन्यायकारक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. अमरावतीत आरोग्य मंत्री राजेश टोपे आले असता 400 खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारणार असल्याचे सांगितले होते. त्याचे काय झाले, असा सावल उपस्थित केला. तसेच अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शक्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांची तत्काळ बदली करा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
हेही वाचा -'सर्व्हर डाऊन' झाल्याने लसीकरणासाठी ज्येष्ठांना राहावे लागले ताटकळत