अमरावती -पत्नीच्या माहेरकडून चांगला हुंडा मिळावा, अडल्यानडल्याला सासर कामी पडावे, दुचाकी, चारचाकी मिळावी, शासकीय नौकरीसाठी सासऱ्याने मदत करावी, अशा अनेक हेतूने लग्न जुळविल्या जातात. मात्र, ते हेतू साध्य न झाल्यास विवाहितांना शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागते. अशा नानाविध तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र, वरूड पोलीस ठाण्यात एक अजब तितकीच चिंतनिय तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही तक्रार आहे चक्क किडनीबाबतची. पतीने किडनीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार पत्नीने वरुड पोलीस ठाण्यात दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार -
पीडित विवाहितेने 5 ऑगस्ट रोजी रात्री ११च्या सुमारास वरूड पोलीस ठाणे गाठून पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. सागर रमेश दातीर (29) रा. जरूड, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, मारहाण, कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, आरोेपी व पीडिताचे मे 2019 मध्ये लग्न झाले होते. आरोपी पतीला लग्नाआधीच किडनीचा आजार होता. त्याचे डायलिसीसही सुरू होते. मात्र, पत्नीपासून त्याने ते दडवून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने पतीला जाब विचारला. त्यावर तू मला किडनी द्यावी, म्हणूनच तुझ्याशी लग्न केले, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे आरोपीपतीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाणदेखील केली, असे त्या विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. 21 मे 2019 ते 5 फेब्रुवारी 2020 दरम्यान या घटना घडल्या. किडनीच्या कारणावरून पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालवल्याचेदेखील पीडिताने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.