अमरावती - राज्यात मागील एक महिन्यापासून कडक लॉकडाऊन आहे. यामध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. मात्र कापड बाजारपेठ मागील महिन्यापासून बंद आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या कापड बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल होत असते मात्र लॉकडाऊनमुळे ही उलाढाल ठप्प झाली आहे. बाजारपेठ बंद असल्याने नेहमी ग्राहकांनी गजबजून दिसणाऱ्या या परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
अमरावती येथील ड्रीमलैंड, सिटी लँड, ड्रीम लँड या तीनही मोठ्या कापड बाजार पेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये संपूर्ण विदर्भातून छोटे-मोठे कापड व्यावसायिक हे खरेदीसाठी येतात. परंतु लॉकडाऊनमुळे या बाजारपेठे बंद असल्यामुळे येथे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
कामगारांवर उपासमारीची वेळ-
विदर्भातील सर्वात मोठ्या कापड बाजारपेठेमध्ये हजारो कामगार काम करत असतात. परंतु दुकाने बंद असल्याने या कामगारांनाही काम नाही त्यामुळे हे कामगारही बेरोजगार झाले आहेत. आता या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.