अमरावती :अमरावती शहरापासून साधारणतः २५ किलोमीटर अंतरावर अमरावती ते चांदूर रेल्वे या राज्य महामार्गावर, मांजरखेड कसबा या गावाच्या वेशीवरच, खोलाट नदीच्या काठावर ६०० वर्ष जुने असलेले प्राचीन पातळेश्वर आणि गुप्तेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिराचा इतिहास खूप वेगळा आहे. वऱ्हाड प्रांतातील 'छोटे हरीद्वार' असा उल्लेख या मंदिराचा तत्कालीन लेखातून करण्यात आला आहे. विदर्भात 'गायमुख' या नावाने हे शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे.
उंबराच्या झाडाचे दूध पिंडीवर पडत असल्याचा इतिहास :गुप्तेश्वर आणि पातळेश्वर अशा दोन स्वयंभू पिंड या मंदिरात आहेत. तपोनेश्वर येथुन सोडलेल्या मेंढ्या या येथील मंदिरा पर्यंत जशाच्या तशा पोहोचल्याचा इतिहास आहे. या मंदिरात एक उंबराचे झाड होते. त्या उंबराच्या झाडाचे दूध त्या शंकराच्या पिंडीवर पडत असल्याचा प्राचीन इतिहास असल्याची माहिती, श्री पातळेश्वर व श्री रामचंद्र संस्थांनचे सचिव अशोक श्यामराव देशमुख यांनी दिली. या मंदिरातील मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. गेल्या 42 वर्षापासून आम्ही या ठिकाणी दहा दिवसीय महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतो. यावर्षी उद्यापासून महाशिवरात्री शिवपुराण व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाला सुरुवात होत असल्याचे, संस्थांनचे सचिव देशमुख यांनी सांगितले.
श्रावण महिन्यात असते मोठी गर्दी :दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी येतात. यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली यासह संपूर्ण महाराष्ट्रातूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ती झाल्याचे भाविक भक्त सांगत असल्याचे काही भक्तांनी यावेळी सांगितले. दरवर्षी साधारणतः २० ते २५ हजार श्रद्धाळू या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव देशमुख यांनी दिली.