अमरावती -ग्रामस्थांच्या मदतीने दगडांचा सडा पडला असणारी उजाड अशी टेकडी सामाजिक वनीकरणाच्या ( Amravati Hill Beautification ) माध्यमातून विविध प्रजातींच्या वृक्षांनी हिरवीगार होते आहे. तिवसा तालुक्यात येणाऱ्या अमरावती ते कुऱ्हा मार्गावर ( Amravati Kurha Road Hill Plantation ) उजव्या बाजूला 25 एकर जागेवर पसरलेली ही टेकडी आता या मार्गावरून जाणार्या प्रत्येकाचे लक्ष वेधत आहे.
जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम -महाराष्ट्र शासनाच्या हरित टेकडी उपक्रमांतर्गत अमरावती-कुऱ्हा मार्गावर असणाऱ्या या टेकडीचा सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होतो आहे. गत वर्षी मार्च महिन्यात या टेकडीवर मृदा जलसंधारणाचे काम करण्यात आले. यामुळे यावर्षी पावसाळ्याचे पाणी या टेकडीवरून वाहून न जाता ते टेकडीवरच मुरले गेले. टेकडीच्या पायथ्याशी 30 बाय 30 मीटर आकाराचा तलाव खोदण्यात आले आहे. या तलावात आधी पावसाचे पाणी साठवण्यात आले, तर त्यानंतर टँकरद्वारे पाणी आणण्यात आले. मात्र, आता 1 मार्च रोजी टेकडीच्या पायथ्याशी बोअर खोदण्यात आले. या बोअरला शंभर फुटावर चार इंच पाणी लागले. या बोअरचे पाणी आता तलावात साठविण्यात येत आहे. तलावातील पाणी उंच टेकडीवर नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून या तलावातील पाणी एका टँकरमध्ये भरून हा टँकर टेकडीला फेरी मारत असतो. या टँकरमधील पाणी टेकडीवर नेण्यासाठी लगतच्या गावांमधील मजुरांची मदत घेतली जात आहे.
एकूण 7777 वृक्षांची लागवड -25 एकरच्या या टेकडीवर एकूण 7777 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. एकूण 23 प्रजातींच्या वृक्षांची लागवड या टेकडीवर करण्यात आली असून यामध्ये सागवान, निंब, चिंच, बांबू, सेमल, शिसम, सिताफळ, फापडा, शेवगा, करंज, कांचन शिसम, सेमल, सिमारुबा, आदी वृक्षांचा समावेश असल्याची माहिती तिवसा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष धापड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. एकूण 7777 पक्षांपैकी 7500 वृक्ष भर उन्हातही जिवंत असल्याचे संतोष धापड म्हणाले.