अमरावती - जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला गावात पाल मांडून जडीबुटी विक्री करणाऱ्या कुटुंब लॉकडाऊन असल्याने मंगळवारी आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलिसांनी अडवल्याने अर्ध्या प्रवासातून परत अंजनगावसुर्जीमध्ये येवून बसस्थानकातील अंधारात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.
जडीबुडी विक्री करणारे हे कुटुंब मूळचे चाळीसगावचे आहे. मात्र, सद्यस्थितीत कारंजा घाडगे येथील रहिवासी आहेत. ते गावागावात पाल मांडून जडीबुटी विकून आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यासाठी हे सहा कुटुंब कारला गावात पाल मांडून राहत होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळ असलेले होते नव्हते पैसे सुद्धा संपले. शिवाय दुसरे कामधंदे नाही. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे त्या सहा कुटुंबातील २३ जणांना कारंजा घाडगे येथे जाण्याचा विचार केला. प्रशासनाला माहिती देऊन हे कुटुंब चार वाहनात बसून गावी जाण्यासाठी निघाले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना कारंजा घाडगे येथे जाऊ दिले नाही. ज्या ठिकाणावरून आले त्याच ठिकाणी परत जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर अर्ध्या प्रवासातून परत येण्याची वेळ आली.