अमरावती-अमरावती जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू करण्यात केला आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना तसेच खाजगी आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट घालूनच दुचाकीने फिरता येणार आहे. तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसून येणाऱ्या व्यक्तीस संरक्षक शिरस्त्राण ( हेल्मेट) परिधान करणे बंधनकारक आहे.
अशी होणार कारवाई-जिल्ह्यातील होणाऱ्या अपघातात, मोटार सायकलचे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहेत. मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 सह 194 (ड) नुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्यामागे बसून प्रवास करणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तीस भारत मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरूद्ध मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 129/177, 250(1) नुसार तसेच कलम 194 (3) अन्वये संबंधित आस्थापना प्रमुख यांचे विरूद्ध गुन्हा नोंद करून एक हजार रूपये दंड ठोठावता येणार आहे. तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणारआहे.
असा आहे अपवाद, अशी आहे शिक्षा -महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 कलम 250 नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर 50 क्युबिक सेंटीमीटरपेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्ती याला अपवाद राहणार आहेत. मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 194 (ड) अन्वये वाहनधारकाने नियम 129 चे उल्लंघन केल्यास तो स्वत: तसेच ज्या आस्थापनामधील जागेवर गुन्हा घडला आहे, त्या आस्थापनेचे प्रमुख नियम उल्लंघनास जबाबदार राहणार आहेत. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी तसेच वरील आस्थापनेत येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना हा नियम लागू राहील, याची नोंद घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते यांनी केले आहे.