अमरावती - यंदा राज्यात पाऊस वेळेवर दाखल झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि त्यांनतर तब्बल एक महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय झाला व हिरवीगार पिके वाऱ्यावर डोलू लागली. मात्र पिके हातातोंडाशी आली असताना पावसाने पुन्हा जोर धरल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल झाला होता. नंतर त्याने दडी मारली. पण आता सतत सुरू असलेल्या पावसामुळे मात्र हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. सध्या सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन काढणीला सुरुवात होईल. परंतु सातत्याने सुरू असलेल्या या पावसामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती वाईट झाली आहे. शेतात पाण्याचे डबके साचल्यामुळे सोयाबीन सडण्याच्या मार्गावर आहे. भरलेल्या सोयाबीनमध्ये कोंब फुटण्याची भीती आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न येईल, या आशेने शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निराशा येणार आहे.
अमरावतीत हजारो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन पिके पाण्यात अनेक दिवसांपासून सुर्यदर्शनही नाही -
शेतातील पिकाला पावसाबरोबरच सूर्यप्रकाशाची गरज आहे. परंतु अनेक दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे पिकांची परिस्थितीही खराब झाली आहे. त्यात यंदा सोयाबीनला सुरुवातीला चांगला दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावर खर्चही केला होता. त्याच्या आशा पल्लित झाल्या होत्या. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि केंद्र सरकारने सोयाबीनची पेंड आयात केल्याने आठ दिवसांमध्ये सोयाबीनचे दर कोसळले आहेत. त्यामुळे दरातही शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसणार आहे.
हे ही वाचा -भर पावसात अमरावती-नागपूर महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांची डागडुजी
सरकारी मदतीची अपेक्षा -
विदर्भात सर्वाधिक कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतले जाते. मागील वर्षी बोंडअळीने कपाशी पिकाचा घात केला. यावर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी असला तरी सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीचे बोंड देखील सडू लागले आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनातही मोठी घट होणार असल्याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी ही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त आहे.