अमरावती- मागील 15 दिवसांपासून विदर्भात पावसाने दांडी मारली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अमरावतीत तर मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दर्यापूर तालुक्याला जबर फटका बसला आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील रोडवर शेतकऱ्यांचे ही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेरलेल्या शेतात अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे.
कंत्राटदाराने चुकीमुळे शेतात पाणी शिरले -
दरम्यान या संपूर्ण परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी आज तालुक्याचा दौरा केला. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी रस्ता बांधकामाच्या वेळी कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने नाल्या बांधल्याने आमच्या शेतात पाणी साचले, असा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी केला. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली.