अमरावती :रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळली आहेत. रस्त्यावर झाडे कोसळल्याने अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.
राजापेठ ते दस्तूर नगर मार्ग बंद : शहरातील राजापेठ ते दस्तूर नगर मार्गावर कडुनिंबाची पाच मोठी झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. अनेक झाडे रस्त्यावरील पानटपरीवर कोसळल्याने काही पान टपरींचे देखील नुकसान झाले आहे. पहाटे तीन वाजता विजांच्या कडकडाटासह प्रचंड वादळ आणि पाऊस आल्यामुळे राजापेठ दस्तूर नगर परिसरातील भली मोठी झाड कोसळली आहेत.
बडनेरा मार्गावर विजेचे खांब पडले :राजापेठ ते बडनेरा मार्गावर वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळली असून विजेचे खांब देखील तुटून पडले आहेत. शहरात बडनेरा मार्गावर सर्वाधिक वर्दळ असते, मात्र या मार्गावरील वाहतुकीचा वेग रस्त्यात पडलेला झाडांमुळे मंदावला आहे. मुसळधार पावसामुळे बडनेरा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पहाटे येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे स्थानकावर असलेल्या पाण्यातूनच रस्ता काढावा लागतो आहे.