अमरावती -एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनुसार आज अमरावती जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चिखलदरा तालुक्याला तर गारपीटीने अक्षरशः झोडपून काढले आहे.
अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका; चिखलदरा तालुक्यात प्रचंड गारपीट
जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अचलपूर, परतवाडा, तिवसा आदी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने काढणीला आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्याला या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज अमरावती जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान चिखलदरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठया प्रमानावर प्रचंड गारपीट झाली आहे. तसेच जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अचलपूर, परतवाडा, तिवसा आदी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने काढणीला आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या कापूस, तूर आदी शेतमालाला भाव नाही त्यात आता आलेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.