अमरावती - जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांमध्ये चांगला मुसळधार पाऊस झाला आहे. यानंतर अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे शुक्रवारपासून उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला. या पुराचे पाणी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरले तर काही गावांचा पूर्णतः संपर्क तुटला. तसेच श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुलाच्या लोखंडी पाईपांची तुटफुट झाली आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे शनिवारी १३ ही दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला. यामुळे अमरावती ते वर्धा जिल्ह्याला जोडणारा कौंडण्यपूर येथील मोठा पूल हा काल पाण्याखाली गेला होता. त्यातच पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरील लोखंडी कठडे अक्षरशः वाहून गेले. तर पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ देखील साचला आहे. यासह पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून दोन्ही बाजूच्या लोखंडी पाईपांमध्ये मोठमोठे खोडे अटकल्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले होते.