महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाचणी केंद्राच्या प्रमुखांनाच झाला कोरोना; कर्तव्याबाबत केंद्रातील इतर सारे दक्ष - corona news amravati

अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळा केंद्राच्या प्रमुखांना कोरोना झाल्याचे समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र, केंद्र प्रमुखांना कोरोना होण्याचा आणि या कोरोना चाचणी केंद्राचा काही एक संबंध नसल्याचे समोर आले आहे. केंद्र प्रमुखांना कोरोनाची लागण ही प्रयोगशाळेतून झाली नसून विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळा अतिशय सुरक्षित असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

head-of-the-corona-testing-center-found-corona-positive-in-amravati
कोरोना चाचणी केंद्राच्या प्रमुखांनाच झाला कोरोना; कर्तव्याबाबत केंद्रातील इतर सारे मात्र 'पॉझिटिव्ह'

By

Published : Aug 1, 2020, 4:53 PM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोना संशयितांच्या स्वॅबची योग्य अशी तपासणी करून अहवाल देणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळा केंद्राच्या प्रमुखांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. अशा या संकट काळात या चाचणी केंद्रातील इतर वैज्ञानिक, विद्यार्थी आणि कर्मचारी मात्र आपल्या कर्तव्याबाबत अतिशय दक्ष असून अमरावती शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांवर त्वरीत योग्य उपचार व्हावा यासाठी योग्या त्या उपाययोजना केल्या जात आहे.

कोरोना चाचणी केंद्राच्या प्रमुखांनाच झाला कोरोना; कर्तव्याबाबत केंद्रातील इतर सारे मात्र 'पॉझिटिव्ह'

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून हळूहळू परिस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 2 हजारावर पोहोचली आहे. जिल्ह्यात 3 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाचा अहवाल नागपूर येथील कोरोना चाचणी केंद्रातून आला होता. सुरुवातीला नागपूर आणि त्यानंतर अकोला येथून अमरावती शहर आणि जिल्ह्यातील संभाव्य कोरोना रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल यायला लागले. यानंतर अमरावतीत आता कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेतला. जैवतंत्रज्ञान विभाग, सुक्ष्मजीव विभाग, आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार्याने 4 मे ला विद्यापीठात कोरोना चाचणी प्रयोगशाळेला सुरुवात केली.

विद्यापीठाच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र, चाचणी केंद्रात सर्व काही सुरक्षित असून या केंद्रामुळे कोणालाही कोरोना होणार नाही असा केंद्र प्रमुखांनी दावा केला आणि या केंद्रात कोरोना चाचणी व्हायला सुरुवात झाली. या प्रयोगशाळेद्वारे 31 जुलैपर्यंत 15 हजार 338 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 12 हजर 504 जणांचे अहवाल हा निगेटिव्ह तर 1 हजार 433 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता इथल्या केंद्र प्रमुखांनाच कोरोना झाल्याचे समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून काम करणाऱ्या केंद्र प्रमुखांना कोरोना होण्याचा आणि या कोरोना चाचणी केंद्राचा काही एक संबंध नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - पेंढा जाळणे रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती सादर करा - सर्वोच्च न्यायालय

चाचणी केंद्राच्या प्रमुखांची मुलगी ही अकोला येथे वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. काही दिवसांपूर्वी ती अमरावतीला घरी आली. तिची प्रकृती बरी नव्हती तसेच, कोरोना चाचणी केंद्र प्रमुखांनाही अस्वस्थ वाटायला लागल्याने त्यांनी स्वतःसह घरातील सर्वांची कोरोना चाचणी केली असता त्यांना आणि मुलीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. सध्या मुलीसह त्यांच्यावर येथील दयासागर रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती आता बरी आहे. दरम्यान, विद्यापीठातील सफाई कर्मचारी महिला मूल्यांकन विभागात काम करणारा कंत्राटी कर्मचारी आणि परीक्षेसंबंधीत विद्यापीठाला साहाय्य करणाऱ्या लर्निंग स्पायरल कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोरोना झाला असल्याने आधीच कोरोनाने धास्तावलेल्या विद्यपीठातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत कोरोना चाचणी केंद्राचा 'ईटीव्ही भारत'ने प्रत्यक्ष आढावा घेतला.

कोरोना चाचणी केंद्रात महत्त्वाची जबाबदारी असणारे डॉ. प्रशांत गावंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, प्रयोगशाळेचे वातावरण अतिशय सुरक्षित आणि चांगले आहे. सध्या कामाचा भार वाढला असला तरी आम्ही सर्व शांतपणे व्यवस्थित काम करीत आहोत. या कामात आम्हाला जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकत्साकांची चांगली मदत होत आहे. या प्रयोगशाळेत आतापर्यंत 15 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या असून आता महिनाभरात आम्ही 20 हजार चाचण्यांचा टप्पा गाठू असेही डॉ. प्रशांत गावंडे म्हणाले. विद्यापीठात सुरू झालेल्या कोरोनाचाचणी प्रयोगशाळेमुळे एका दिवसात कोरोना चाचणी अहवाल प्राप्त व्हायला लागल्याने रुग्णांवर त्वरित उपचार होण्यास मोठी मदत झाली असून ही प्रयोगशाळा सुरक्षित असल्याचे विद्यापीठांचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर म्हणाले. तर, केंद्र प्रमुखांना कोरोनाची लागण ही प्रयोगशाळेतून झाली नसून विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळा अतिशय सुरक्षित असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील किंवा त्याच्या परिचयातील व्यक्तीच्या मनात भिती निर्माण होणे ही वस्तूस्थिती आहे. मात्र, केंद्रप्रमुख कोरोनाबाधित असले तरी त्यांच्या कोरोना होण्याचा आणि या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचा काहीही संबंध नाही. इथे कार्यरत कर्मचारी आतिशय सकरात्मक विचारसरणीचे असल्याने सगळे काळजीपुर्वक काम करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details