अमरावती- अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो अमरावतीकरांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित धावपटू रोनाल्डो किबीओट हे या स्पर्धेचे खास आकर्षन ठरले. त्यांनी हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन २१.१ किलोमीटरचे अंतर अवघ्या एका तास सात मिनिटात पार करून विक्रम नोंदविला.
जिल्हा क्रीडा संकुल येथून आज सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर १० किलोमीटर पावर रन आणि पाच किलोमीटर अंतरापर्यंत चिल्ड्रन्स ड्रीम रन, तसेच महिलांकरिता विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली. हाफ मॅरेथॉन व पावर रनमध्ये धावपटूंची अचूक वेळ नोंदवता यावी याकरिता प्रत्येक धावपटूला २१ किलोमीटर अंतरात चार वेळा इलेक्ट्रॉनिक सेंसर पॉईंट पार करावा लागला. केनिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धक रोनाल्ड किबीओट यांनी पुरुष गटात बाजी मारली तर सेली जिबियो या महिला गटात विजयी ठरल्या.