अमरावती- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांसह बहुजन वंचित आघाडीच्या नेत्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी प्राचार्य अंजली आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
वंचित बहुजन आघाडीतर्फे गुणवंत देवपारेंनी केला अमरावतीतून उमेदवारी अर्ज दाखल - वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावतीतून गुणवंत देवपारेंनी अर्ज दाखल केला असुन यावेळी देवपारे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.
![वंचित बहुजन आघाडीतर्फे गुणवंत देवपारेंनी केला अमरावतीतून उमेदवारी अर्ज दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2795067-791-4a83db6d-c1e4-4316-b8ad-6303020dc08c.jpg)
गाडगेबाबा समाधी मंदिर येथून वंचित बहुजन आघाडीची मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पोहचली. मिरवणुकीदरम्यान इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गुणवंत देवपारे, अंजली आंबेडकर यांनी पुष्पाहार अर्पण करत अभिवादन केले. शेकडो कार्यकर्त्यांसह गुणवंत देवपारे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
देवपारेंचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर अंजली आंबेडकर म्हणाल्या, जी संविधान जपणारी माणसं आहेत ती शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीसोबत राहतील. उमेदवारी मिळाली नाही म्हणून आमच्या पक्षातील कोणी पक्ष सोडून गेला नाही. आमच्याशी चर्चा करणाऱ्यांचा मुलगा मात्र दुसऱ्या पक्षात निघून गेला, असे म्हणत अंजली आंबेडकर यांनी काँग्रेसला टोला लगावला. दरम्यान, सोलापूर येथून प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे कोण उमेदवार असेल हे उद्या कळेल असेही अंजली आंबेडकर म्हणाल्या.