अमरावती - परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचा घात केल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्यानंतर आता कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केल्याने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अमरावती जिल्ह्यातील कठोरा, गोपाळपूर, पुसदा या गावातील शेतशिवाराची पाहणी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा लावून धरणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं.
यशोमती ठाकूर यांच्याकडून बोंड अळीने नुकसानग्रस्त शेतशिवारांची पाहणी, सरकारी मदतीचे आश्वासन
अमरावती जिल्ह्यातील कठोरा, गोपाळपूर, पुसदा या गावातील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केली. महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे. सर्वोतोपरि मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री यशोमती ठाकूर
आधी सोयाबीनने मारले आता कपाशीचे घात केला -
यावर्षी सुरुवातीला बोगस बियाण्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. त्यानंतर उरले-सुरले सोयाबीन हे खोडकिडी रोगाने व परतीच्या पावसाने खराब झाल्याने शेतकऱ्यांचे लावणीचे पैसेही निघाले नाहीत. आता पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशी पिकावरही पंधरा दिवसांपासून बोंडअळीने आक्रमण केलंय. झाडावर असलेल्या बोंडापैकी अर्ध्यापेक्षा जास्त बोंडे बोंडअळीने बाधित झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे.
Last Updated : Nov 2, 2020, 4:59 PM IST