महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची कोव्हीड वॉर्डाला भेट, रुग्णांना दिला दिलासा

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील स्थापित कोव्हीड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांंनी जिल्हा कोव्हीड रुग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. तसेच तेथील कोव्हीड वॉर्डातील पॉझिटिव्ह व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

yashomati thakur amravati news
अमरावती : पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची कोव्हीड वॉर्डाला भेट, रुग्णांना दिला दिलासा

By

Published : May 31, 2020, 5:05 PM IST

अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा कोव्हीड रुग्णालयाला भेट देऊन दाखल असलेल्या रुग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेतला. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा दिला.

गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोव्हीड रुग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणाची परिस्थिती पाहण्याचा व रुग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला आणि तत्काळ अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी शनिवारी सायंकाळी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील स्थापित कोव्हीड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोव्हीड रुग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोव्हीड वॉर्डातील पॉझिटिव्ह व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रुग्णसेवा देत असते. आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्ताने मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, कोव्हीड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रुग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रुग्णांनी दिली. पालकमंत्री पुढे म्हणाल्या, अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

दरम्यान, जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत. आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्णांवर याच रुग्णालयातून उपचार होऊन ते बरे होऊन घरी परतले आहेत. तर, उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. आपण कोव्हीड रुग्णालयातील प्रत्येक दाखल व्यक्तीला भेटून विचारपूस केली आहे. प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रुग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details