अमरावती -ग्रामीण भागात कोरोनाबाधित वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुविधा वाढविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी गुरुकुंज मोझरी येथे १७५ खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यापुढेही रुग्णांना तत्पर वैद्यकीय उपचार सुविधा यासह आरोग्य यंत्रणा अधिक सूसज्ज करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
हेही वाचा -पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली गुरुदेव नगरच्या स्मशानभुमीच्या रस्त्याच्या जागेची पाहणी
मोझरी सेंटरची केली पाहणी
गुरुकुंज मोझरी स्थित श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय (धर्मदाय) १७५ खाटांच्या कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा करणार सक्षम
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक उपचार सुविधा गतीने उभारण्यात येत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात शंभर खाटांचे नवे स्वतंत्र रुग्णालय उभे राहणार आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या मधुमेही व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजार होताना आढळून येत आहे. जिल्ह्यात मुक्यरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळून आले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी अधिक खर्च लागतो. जिल्ह्यात कोरोना व म्युकरमायकोसिस आजारांचा आकस्मिक आजारात समावेश करण्यात आला असून गरीब रुग्णांना या आजारांवर उपचाराचा खर्च महात्मा ज्योतीराव फुले जीवनदायी योजनेचा लाभ देऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्माशानभूमीच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणाचे आदेश
गुरुकुंज मोझरी येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी होत होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी काल तिथे प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करून लवकरात लवकर पक्का रस्ता करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाबाबत आदेश प्रशासनाला दिले.
हेही वाचा -अमरावतीत एकाच कुटुंबातील २ सख्ख्या भावांसह तिघांचा कोरोनाने मृत्यू