महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मरणयातना: मेळघाटातील बालिकेची मरणानं केली सुटका, पण . . .

पाणी काढताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या मनिषा धांडे या बालिकेच्या मरणानंतरही यातना संपल्या नाहीत. तिच्या पालकांकडे तिचा मृतदेह गावी आणायला पैसे नसल्याने तो नागपूरच्या रुग्णालयातच पडून होता.

By

Published : Jun 21, 2019, 11:35 AM IST

मृत मनिषा

अमरावती- 'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', अशी सुरेश भट यांची रचना आहे. त्यातून मरणानंतर माणसाची सगळ्या यातनातून सुटका होते, असे मत व्यक्त करण्यात आलं आहे. मात्र काहींच्या यातना मरणानंतरही संपत नाहीत. असाच प्रकार मेळघाटातील बालिकेच्या नशीबी आला आहे. मेल्यानंतरही त्या बालिकेच्या मरण यातना संपल्या नाहीत. मनिषा धांडे असे या मरणानंतरही यातना भोगणाऱ्या बालिकेचं नाव आहे.

मनिषा धांडे ही बालिका मेळघाटातील मोथा या गावची राहणारी होती. मेळघाटात भीषण पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पसाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळे मनिषा पाण्यासाठी विहिरीवर गेली. मात्र पाण्याची बाटली ओढत असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. त्यामुळे मनिषा गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी मनिषाला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र १० दिवसानंतर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. मृत्यूनंतरही तिच्या यातना सुरू झाल्या.

अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने तिचा मृतदेह गावी नेण्यासाठीचे पैसे तिच्या पालकांकडे नव्हते. त्यामुळे मनिषाच्या मृतदेहाचे करायचे काय असा प्रश्न तिच्या आई-वडिलांना पडला. प्रचंड विवंचनेत असलेल्या मनिषाच्या पालकांची स्थिती मेळघाटातील सामाजिक कार्यकर्त्याला समजली. त्यानंतर त्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती टाकली. सोशल मीडियावरील माहिती जिल्हा प्रशासनाच्या कानावर गेली. मेळघाटात पाणीटंचाईची बळी ठरलेल्या बालिकेचा मृतदेह गावी नेण्याची सोय नसल्याचे कळताच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्परता दाखवली. त्यांनी वाहनाची व्यवस्था करत मनिषाचा मृतदेह घरी नेण्यासाठी मदत केली. त्यामुळे रुग्णालयात पडून असलेला मृतदेह प्रशासनाच्या मदतीने गावी आणून मनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाणीटंचाईची बळी ठरलेल्या मनिषाच्या यातना मरणानंतरही संपल्या नसल्याने मेळघाटातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details